esakal | आदित्यच्या चढाईनंतरही  सचिन अहिरांचे पानिपत 
sakal

बोलून बातमी शोधा

आदित्यच्या चढाईनंतरही  सचिन अहिरांचे पानिपत 

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी संघटनेचे मतदान सुरू असताना उपस्थित राहून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला.

आदित्यच्या चढाईनंतरही  सचिन अहिरांचे पानिपत 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई शहर कबड्डी संघटनेच्या निवडणुकीस थेट राजकीय रंग चढल्याचे रविवारी (ता. 25) दिसले. संघटनेतील कृष्णा तोडणकर गटास शिवसेना पुरस्कृत म्हटले जात आहे, त्यातच युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी संघटनेचे मतदान सुरू असताना उपस्थित राहून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतरही या पॅनेलमधील सचिन अहिर तसेच त्यांच्या सर्व सहकारी उमेदवारांचा पराभव झाला. 

माजी मंत्री सचिन अहिर आमदार असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. आता, भाई जगताप-सचिन अहिर हे कबड्डी संघटनेच्या निवडणुकीत आमने-सामने आहेत. या पार्श्‍वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या भेटीला महत्त्व आले आहे. शिवसेनेचे काही आमदार आणि नगरसेवकही या निवडणुकीसाठी उपस्थित होते.

मतदारांपेक्षा शिवसेना कार्यकर्त्यांचीच परिसरात प्रचंड गर्दी होती. पण त्याचा मतदानावर फारसा परिणाम झाला नाही. भाई जगताप यांच्या मारुती जाधव गटाने सचिन अहिर असलेल्या तोडणकर गटास 25 पैकी एकाही उमेदवारास यश मिळवू दिले नाही.

मुंबई कबड्डी संघटनेतील काही उमेदवार या निवडणुकीस शिवसेना विरुद्ध अन्य असे मानायला तयार नाहीत. तोडणकरांच्या विरोधात असलेल्या जाधव गटातील काही उमेदवारही शिवसेनेचे आहेत. या निवडणुसाठी अहिर गटाचे चिन्ह "बाण', तर प्रतिस्पर्धी गटाचे चिन्ह "धनुष्य' आहे, याकडेही लक्ष वेधले जात आहे. सचिन अहिर यांच्या गटातील सर्व उमेदवारही शिवसेनेचे नाहीत, असेही काहींचे मत आहे. 

शिवसेना भवनात झाली होती बैठक 

दरम्यान, आदित्य ठाकरे हे केवळ निवडणुकीच्या दिवशी आले नाहीत, तर त्यापूर्वी त्यांनी मतदारांच्या प्रतिनिधींची शिवसेना भवनात बैठकही घेतली होती. त्यास चांगला प्रतिसाद लाभला होता, असेही सूत्रांनी सांगितले. प्रत्यक्षात अहिर असलेल्या पॅनेलचा 152-200 असा पराभव झाल्याचे सांगितले जात होते. 

loading image
go to top