ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार परीक्षा; उदय सामंताची महत्वपूर्ण माहिती, वाचा सविस्तर

तुषार सोनवणे
Friday, 4 September 2020

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षाच्या परिक्षा होणार असून लवकरच विद्यापीठ या परिक्षांच वेळापत्रक जाहीर करणार आहे.

मुंबई : अंतिम वर्षाची परीक्षा ही तीन तासांऐवजी एक तासांची व 100 गुणांऐवजी 50 गुणांची घेण्यात येणार असल्याचे संकेत शुक्रवारी (ता.4) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. मात्र या परीक्षा घेताना तंत्रज्ञानावर भर देत लेखी परीक्षांसाठी विद्यापीठाला एमसीक्यू, असाईमेंट किंवा ओपन बूकचे पर्याय खुले केले आहेत. तसेच प्रात्याक्षिक परीक्षा स्कायपे सारख्या मिटींग अ‍ॅप किंवा टेलिफोनिक पद्धतीने घेण्याच्या सूचनाही उदय सामंत यांनी केल्या आहेत. परीक्षा पद्धती, वेळापत्रक व अभ्यासक्रम याबाबत तातडीने निर्णय घेऊन 7 सप्टेंबर पर्यंत सरकारकडे अहवाल सादर करावा, अशाही सूचना त्यांनी विद्यापीठाला दिल्या आहेत.

दिलासा! पाच हजार कोरोनामुक्त 80 वर्षांहून अधिक वयाचे; भीती न बाळगण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्य सरकारने कुलगुरूंची समिती स्थापन केली होती. या समितीने शुक्रवारी राज्य सरकारला सादर केलेला अहवाल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला. यामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत विद्यार्थ्यांना घरी बसून परीक्षा देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. विद्यापीठांची गुणवत्ता कायम राखण्यासाठी कमीतकमी कालावधीत परीक्षा घेताना त्या ऑनलाईन, ऑनलाईन व ऑफलाईन किंवा पेन व पेपर यांचा वापर करून घरातूनच परीक्षा घ्यावी, दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सोईसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा 11 सूचना अहवालामध्ये समितीकडून मांडण्यात आल्या होत्या. यावर विद्यापीठाची शिक्षण समिती आणि परीक्षा मंडळाची तातडीने बैठक घेऊन परीक्षा कशा पद्धतीने घेता येतील, यावर चर्चा करून त्याची माहिती 7 सप्टेंबरपर्यंत सरकारला देत परीक्षेचे वेळापत्रक व अभ्यासक्रम तातडीने जाहीर करावी, अशी सूचना सरकारकडून देण्यात आली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देताना तंत्रज्ञानावर अधिकाधिक भर देत लेखी परीक्षांसाठी एमसीक्यू, असाईमेंट किंवा ओपन बूकचे पर्याय उपलब्ध करून देताना प्रात्याक्षिक परीक्षा स्कायपे सारख्या मिटींग अ‍ॅप किंवा टेलिफोनिक पद्धतीने घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. तसेच ज्या विद्यार्थांना काही कारणांमुळे परीक्षा देता आली नाही तर अशा विद्यार्थांसाठी पुन्हा परीक्षा घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हात प्रत्यारोपणानंतर मोनिकाच्या प्रकृतीत सुधारणा; फिजिओथेरपी सुरू करणार

त्याचप्रमाणे विद्यापीठांनी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन परीक्षा घेण्यात अडचण असल्यास त्याची माहिती तातडीने सरकारला कळवावी, जेणेकरून परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात यूजीसीला कळवून मुदतवाढ घेण्यात येईल, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The exam will take place in the first week of October; Important information about Uday Samantha, read in detail