
राज्य मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने दिलासा दिला आहे. अभ्यासक्रमातून रद्द झालेल्या विषयांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागाने दिलासा दिला आहे.
मुंबई ः राज्य मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने दिलासा दिला आहे. अभ्यासक्रमातून रद्द झालेल्या विषयांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागाने दिलासा दिला असून, केवळ या वर्षासाठीच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून वगळलेल्या विषयांची परीक्षा देण्याची परवानगी शिक्षण विभागाने दिली आहे.
यंदाच्या वर्षापासून बारावीसाठी सुधारित विषय आणि मूल्यमापन योजना निश्चित केली आहे. यानुसार शाखानिहाय गट ए, बी, सीमध्ये विषयांची विभागणी केली आहे. काही विषय अभ्यासक्रमातून रद्द केले आहेत. 8 ऑगस्ट 2019 रोजी या विषयीचा अध्यादेश जारी केला होता; मात्र कनिष्ठ महाविद्यालये आणि शिक्षकांचे या अध्यादेशाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे शिक्षकांनी जुन्याच विषय योजनेनुसार विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू ठेवला. परिणामी जे विषय अभ्यासक्रमातून वगळले आहेत त्या विषयांची विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेच्या दृष्टीने तयारी केली. बारावी परीक्षेचे अर्ज भरतेवेळी ही बाब समोर आली. कारण जे विषय वगळले ते परीक्षा अर्जातूनही गायब होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना फक्त यंदाच्या वर्षापुरती जुन्या विषयांची परीक्षा देण्याची मान्यता दिली आहे.
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
जुन्या विषयांनुसार परीक्षा देण्याची सवलत केवळ यंदाच्या परीक्षेपुरती असून, वर्ष 2021-22 पासून बारावीच्या विद्यार्थ्यांना ही सवलत मिळणार नाही. महाविद्यालयांनीही बंद झालेल्या विषयांचे किंवा शाखेसाठी उपलब्ध नसलेल्या विषयांचे अध्यापन तातडीने बंद करावे, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. जुन्या विषयांची परीक्षा देणारे जे विद्यार्थी त्या विषयात किंवा अन्य विषयांत नापास होतील त्यांना पुन्हा तोच विषय घेऊन फेरपरीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.
सुधारित विषय निश्चिती योजना
अवेस्ता-पहलवी, सामान्यज्ञान, हिंदी उपयोजित, मराठी साहित्य, इंग्रजी साहित्य, स्टेनोग्राफी (इंग्रजी/मराठी).
- ग्रुप सीमध्ये समावेश झालेला शिक्षणशास्त्र हा विषय यापुढे केवळ कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध.
- समाजशास्त्र, मानसशास्त्र, तर्कशास्त्र, सहकार, राज्यशास्त्र हे विषय ग्रुप सीमध्ये समाविष्ट झाले असून, यापुढे यांपैकी कोणत्याही एका विषयाची निवड करता येणार.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही
- अवेस्ता-पहलवी, सामान्यज्ञान, हिंदी उपयोजित, मराठी साहित्य, इंग्रजी साहित्य, स्टेनोग्राफी (इंग्रजी/मराठी) या विषयांचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार.
- विज्ञान शाखेच्या ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षणशास्त्र विषय घेतला आहे त्यांनाही परीक्षा देण्याची मुभा.
- समाजशास्त्र, मानसशास्त्र, तर्कशास्त्र, सहकार, राज्यशास्त्र यांपैकी एकापेक्षा अधिक विषय निवडलेल्या विद्यार्थ्यांनाही यंदा परीक्षेची संधी.
Examination of subjects studied Consolation to the Department of Education for 12th
------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )