ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा; विद्यार्थ्यांची घरातूनच परीक्षा? : परीक्षेचा निर्णय उद्या 

तेजस वाघमारे
Monday, 31 August 2020

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना घरी बसूनच परीक्षा देता यावी, अशा परीक्षा पद्धतीचे नियोजन करण्यात येत आहे. याबाबत राज्यातील कुलगुरूंचेही एकमत झाले आहे. त्यानुसार परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देण्यात येणार आहे.

मुंबई : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना घरी बसूनच परीक्षा देता यावी, अशा परीक्षा पद्धतीचे नियोजन करण्यात येत आहे. याबाबत राज्यातील कुलगुरूंचेही एकमत झाले आहे. त्यानुसार परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देण्यात येणार आहे. या परीक्षा ऑक्‍टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात येतील. परीक्षा कोणत्या पद्धतीने होतील, याचा निर्णय बुधवारी (ता.2) जाहीर होईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. 

पालघर साधू हत्या प्रकरणी, ठाकरे सरकारची मोठी कारवाई; 17 पोलिस अधिकाऱ्यांना दणका

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सर्व अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरू सोबत झूमच्या माध्यमातून ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत परीक्षा किती तारखेपर्यंत घेऊ शकतो, परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन, परीक्षेची तारीख किती असावी, निकालाची तारीख किती असावी, परीक्षा पद्धत कशी असेल, अशा विविध विषयांवर कुलगुरू यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. अमरावती व यशवंतराव चव्हाण विद्यापीठाने परीक्षा सुरू करून निकालाची वेळ नोव्हेंबरपर्यंत असावी, अशी भूमिका मांडली आहे. तर उर्वरित 11 विद्यापीठांनी परीक्षा घेण्यासाठी 31 ऑक्‍टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. विद्यापीठांना वेळापत्रक निश्‍चित करण्यासाठी आणखी एक दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. त्यानंतर परीक्षा पद्धतीसंदर्भात गठीत केलेल्या समितीची बैठक बुधवारी (ता.2) सकाळी होईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपत्कालीन व्यवस्थापनाची बैठक घेउन परीक्षे घेण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. हा निर्णय युजीसीला कळविण्यात येणार असल्याचे, सामंत म्हणाले. 

विद्यार्थांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागणार नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांनी काळजी करू नये. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. ऑक्‍टोबर महिन्यात युजीसीच्या सूचनांनुसार सर्व विद्यापीठ परीक्षेचे आयोजन करून निकाल जाहीर करतील असेही सामंत यांनी सांगितले. 

अतिधोकादायक इमारतींबाबत भिवंडी महापालिकेचा 'मोठा' निर्णय; नागरिकांना केले महत्त्वाचे आवाहन...

31 ऑक्‍टोबरपर्यंत विद्यापीठांनी अंतिम सत्राच्या परीक्षेसंदर्भात निकालासह सर्व प्रक्रिया पूर्ण करावी. ज्या विद्यापीठांना स्थानिक पातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव किंवा तांत्रिक अडचणी आल्यास त्यांनी आपली निकालाची प्रक्रिया जास्तीत जास्त 10 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करावी अशा सूचना सामंत यांनी यावेळी केल्या. 

  • - 31 ऑक्‍टोबर 2020 पर्यंत परीक्षा आणि निकालासह संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार 
  • - अडचणी असणाऱ्या विद्यापीठांना 10 नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी लागणार 
  • - राज्यातील 7 लाख 92 हजार 385 विद्यार्थी देणार परीक्षा 
  • - परीक्षेचा पर्याय निवडण्याचे अधिकार कुलगुरूंना 

.................. 
एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निर्णयही लवकरच 
एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करता विधी व न्याय विभाग आणि ऍडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. यानंतर या परीक्षांचा निर्णयही लवकरच जाहीर करण्यात येईल असेही सामंत यांनी सांगितले.  

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Exams in the first week of October; Students home exams? : Exam decision tomorrow

टॉपिकस
Topic Tags: