सावधान! प्रोटीन्स सप्लिमेंट करतेय बॉडीची बिघाडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

शरीर कमावण्यासाठी अतिरिक्त प्रथिने आणि पूरक आहार (सप्लिमेंट) घेण्याकडे शरीरसौष्ठवपटूंचा कल वाढत आहे; मात्र या दोन्हींच्या आहारी गेल्यास पिळदार शरीरासाठी ते घातक ठरू शकते.

मुंबई ः शरीर कमावण्यासाठी अतिरिक्त प्रथिने आणि पूरक आहार (सप्लिमेंट) घेण्याकडे शरीरसौष्ठवपटूंचा कल वाढत आहे; मात्र या दोन्हींच्या आहारी गेल्यास पिळदार शरीरासाठी ते घातक ठरू शकते, याचा विसर तरुणांना पडत आहे. दोन वर्षांपूर्वी "मुंबई श्री'चा किताब पटकावलेल्या श्रीदीप गावडे याला आदर्श मानणाऱ्या नवख्या शरीरसौष्ठवपटूंनी किमान श्रीदीपवर ओढावलेल्या प्रसंगातून धडा घेण्याची आवश्‍यकता आहे, असे तज्ज्ञांनी अधोरेखित केले. 

महत्वाचं - गटारी भाज्यांच्या शेतीवर कारवाईचा नांगर

आपल्या पिळदार शरीराने नऊ महिन्यांपूर्वी सर्वांना प्रभावित केलेला श्रीदीप सध्या मुंबईत रुग्णालयात उपचार घेत आहे. उच्च रक्तदाबाचा त्रास असतानाही पीळदार स्नायूंसाठी श्रीदीप प्रथिने घेत होता. त्यामुळे त्याच्या मूत्रपिंडाने काम करणेच बंद केले. तरुण वयात शरीरसंपदेची गोडी लागली. त्यातून अनेकांनी त्याला शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी प्रेरित केले. व्यावसायिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्याने प्रथिनांचा आधार घेतला. दोन वर्षे "मुंबई श्री' स्पर्धेसह अनेक महत्त्वाची बक्षिसे त्याने जिंकली. मुंबई श्रीचा किताब पटकावल्यानंतर विवाहासाठी त्याने काही महिने विश्रांती घेतली; मात्र पुन्हा स्पर्धेसाठी सराव सुरू केल्यानंतर त्याने प्रथिने आणि अन्य पूरक आहाराची (सप्लिमेंट) जोड देण्याचे ठरवले. पूरक आहाराच्या दोन डोसनंतर उलट्या झाल्या. अर्थात, तपासणीत त्याचे शरीर अतिरिक्त प्रथिने घेऊ शकणार नाही असे स्पष्ट झाले. एवढेच नव्हे, तर त्याचे मूत्रपिंड निकामी झाल्याचे स्पष्ट झाले आणि त्यावर प्रत्यारोपण हाच उपाय असल्याचे त्याला सांगण्यात आले. त्याच्या 60 वर्षांच्या आईने मूत्रपिंड दान केल्याने श्रीदीपला जीवदान मिळाले. 

महत्वाचं - वाडीया प्रश्नावर सरकारकडून 44 कोटीचं फस्टएड

अतिरिक्त प्रथिने घेतल्यास शरीरात यूरियाचे प्रमाण वाढते आणि ते मूत्रपिंडातून "फिल्टर' होऊन बाहेर पडत असताना त्याचे दुष्परिणाम होतात, असे श्रीदीपवर उपचार करणाऱ्या रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयातील डॉक्‍टर बी. व्ही. गांधी यांनी सांगितले. 

झटपट शरीर कमावण्याचे दुष्परिणाम 
प्रथिने किंवा सप्लिमेंट मर्यादेपेक्षा अधिक घेतल्यास त्याचे दुष्परिणाम होतात. पोळी, भाजी, भात, गायीचे तूप आहारात असल्यास कोणत्याही सप्लिमेंटची गरज नसते. मी स्वतः शरीरसौष्ठवपटू आहे. नियमित आहाराला क्वचितच सप्लिमेंटची जोड देते. "शॉर्टकट'ला अनेक बळी पडतात. शरीर तंदुरुस्त होताना मनही तंदुरुस्त होणे महत्त्वाचे असते. 
- डॉ. मंजिरी भावसार, शरीरसौष्ठवपटू 

कृत्रिम प्रथिनांमुळे मूत्रपिंडावर ताण येतो आणि त्याचे कार्य मंदावते. काही काळानंतर मूत्रपिंडाचे कार्य बंद होते. त्यामुळे कृत्रिम प्रथिने घेताना डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा आणि वेळोवेळी आपली तपासणी करून घ्यावी. गरज नसेल तर सप्लिमेंटचा वापर टाळावा. 
- डॉ. सिद्धार्थ लाखानी, मूत्रपिंडतज्ज्ञ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excess protein is becoming dangerous