इकडचं तिकडे करायचा कुणी प्रयत्न केला तर काही खरं नाही..

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 December 2019

  • नववर्षाच्या जल्लोषावर उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर 
  • राज्यभरात 44 भरारी पथके; 12 तपासणी नाके 

मुंबई : नववर्षाच्या जल्लोषाला अवैध आणि भेसळयुक्त मद्याची बाधा होऊ नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग सज्ज झाला आहे. राज्यभरात 44 भरारी पथके नेमण्यात आली असून, अन्य राज्यांतून होणाऱ्या मद्य-तस्करीला चाप लावण्यासाठी 12 तपासणी नाक्‍यांवर कडक लक्ष ठेवण्याचे आदेश उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगरे वर्मा यांनी दिले आहेत. 

मोठी बातमी : ठाणे मनपाच्या निशाण्यावर Axis Bank; पगारखातं बदललं..    

नाताळ ते नववर्षादरम्यान मोठ्या प्रमाणात अवैध मद्य आणि गावठी दारूची वाहतूक व विक्री होते. अन्य राज्यांतून चोरट्या मार्गाने मद्याची वाहतूक केली जाते. या प्रकारांना चाप लावण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. भरारी पथकांची रात्रीची गस्त वाढवून ढाब्यांची तपासणीही केली जाणार आहे. मोठ्या शहरांमध्ये बनावट व्हिस्कीची विक्री होण्याची दाट शक्‍यता असते. त्यामुळे अशा गुन्ह्यांत यापूर्वी केलेल्या कारवाईतील दोषींवर लक्ष ठेवले जाईल. त्याच ठिकाणी पुन्हा बनावट मद्याची निर्मिती होत असल्यास कारवाई केली जाईल, असे राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी सांगितले. 

नाताळ आणि नववर्षाच्या दृष्टिकोनातून राज्यात 12 तपासणी नाके सुरू केले असून, 44 भरारी पथकांना अवैध मद्यविक्रीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अन्य राज्यांतून अवैध मद्याची वाहतूक होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. 

- उषा वर्मा, संचालक, अंमलबजावणी व दक्षता, राज्य उत्पादन शुल्क विभाग

गोवा, दीव, दमण आणि मध्य प्रदेशातून रेल्वेमार्गाने होणारी अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांचे सहकार्य घेतले जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे रो-रो सुविधेच्या ठिकाणी यापूर्वी गोव्यात तयार झालेले मद्य मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले होते. त्याचप्रमाणे जेएनपीटी बंदरात परदेशातून होणाऱ्या मद्याच्या तस्करीवरही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष राहील, असे सांगण्यात आले. 

मोठी बातमी ''ती'' नकळत झालेली चूक गैरप्रकार नाही - उच्च न्यायालय

विसंगती आढळल्यास गुन्हा दाखल 

राज्य उत्पादन शुल्क विभाग निरीक्षकांना इतर कार्यक्षेत्रांतील परवानाधारकांच्या मद्यसाठ्याची नाताळ ते नववर्षादरम्यान तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या काळात परवानाधारकांच्या मद्यसाठ्यात कुठल्याही प्रकारची गंभीर विसंगती आढळल्यास तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. 

WebTitle : excise department to keep close tab on illegal liquor trafficking   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: excise department to keep close tab on illegal liquor trafficking