कल्याणकरांच्या जलवाहतुकीवर फेरले 'पाणी', खर्चात कपात करण्यासाठी प्रकल्पातून वगळले

सुचिता करमरकर
Wednesday, 21 October 2020

शहरांतर्गत वाहतुकीसाठी प्राधान्याने विचार करण्यात आलेल्या जलवाहतूक प्रकल्पातून कल्याणला वगळण्यात आले आहे. केंद्र सरकारने प्रकल्पाच्या खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली; मात्र हा प्रकल्प मूळ आराखड्यानुसार राबवला जावा, अशी मागणी त्यांनी संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे केली आहे. 

कल्याण : शहरांतर्गत वाहतुकीसाठी प्राधान्याने विचार करण्यात आलेल्या जलवाहतूक प्रकल्पातून कल्याणला वगळण्यात आले आहे. केंद्र सरकारने प्रकल्पाच्या खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली; मात्र हा प्रकल्प मूळ आराखड्यानुसार राबवला जावा, अशी मागणी त्यांनी संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे केली आहे. 

क्लिक करा : वाढवण बंदर परिसरात जमीन खरेदी व्यवहार तेजीत; दलालांचा सुळसुळाट 

मुंबईलगत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरातील नागरिक मागील अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीमुळे त्रस्त आहेत. या कोंडीतून नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी जलवाहतूक प्रकल्पाला प्राधान्य देण्यात आले होते. केंद्र सरकारने या प्रकल्पांतर्गत दहा ठिकाणी जेट्टी बांधण्याचे निश्‍चित केले होते.

यात कल्याण, डोंबिवली, ठाणे, गायमुख, वसई यांचा समावेश करण्यात आला होता; मात्र प्रकल्पाच्या खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर डोंबिवली, काल्हेर, कोलशेत आणि वसई आदी चार ठिकाणी जेट्टी बांधली जाणार आहे; परंतु कल्याण हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने जलमार्गासाठी त्याला प्राधान्य दिले जावे, अशी मागणी खासदार शिंदे यांनी केली आहे. 

केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या पहिल्या पाच वर्षांत तत्कालीन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठाणे-कल्याण-वसई या 50 किलोमीटरच्या मार्गासाठी जलवाहतूक प्रस्तावाला मान्यता दिली होती. यातील पहिल्या टप्प्यासाठी 650 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता.

ठाणे महापालिकेनेही वसई-ठाणे-कल्याण आणि नवी मुंबई असे दोन वाहतूक प्रकल्प प्रस्तावित केले होते. सप्टेंबर 2019 मध्ये डोंबिवलीचे आमदार तसेच तत्कालीन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली येथे जेट्टीचे भूमिपूजन केले होते. यासाठी मेरिटाईम बोर्ड 13 कोटी रुपये खर्च करणार आहे; मात्र प्रकल्पातील खर्चात कपात करण्यासाठी कल्याणला जलवाहतुकीतून वगळल्याने शहरातील नागरिकांचा हिरमोड होणार आहे. 

क्लिक करा : कांदा रडवतोय; किरकोळ बाजारातील दर 100 रुपये किलो

वाहतूक कोंडीतूनच प्रवास! 
कल्याणलगत असलेल्या अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर येथील वाहतुकीचा ताणही शहरातील मुख्य रस्त्यांवर आहे. वाढती लोकसंख्या तसेच वाहनांच्या संख्येत भर पडत असल्याने येथील रस्ते वाहतूक कायमच अडचणीची ठरत आहे. यामुळेच या कोंडीतून सर्वसामान्यांना जलवाहतुकीच्या माध्यमातून दिलासा मिळू शकणार होता; परंतु केंद्राच्या निर्णयाने कल्याणकरांना कोंडीतूनच प्रवास करावा लागण्याची चिन्हे आहेत. 

डोंबिवली पश्‍चिमेत जेट्टी बांधण्याऐवजी कल्याणसारख्या मध्यवर्ती ठिकाणी बांधली गेल्यास या परिसरातील नागरिकांना त्याचा अधिक फायदा होईल. जिल्ह्यातील खाडी किनारे जोडले गेले, तरच पर्यायी मार्ग म्हणून त्यांचा वापर होऊ शकेल. 
- डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार, कल्याण 

________________
(संपादन : प्रणीत पवार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excluded Kalyan from shipping project