वाढवण बंदर परिसरात जमीन खरेदी व्यवहार तेजीत; दलालांचा सुळसुळाट 

चंद्रकांत खुताडे
Tuesday, 20 October 2020

बंदराच्या उभारणीनंतर जागेचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्‍यता असल्याने जमीन खरेदीसाठी हीच योग्य वेळ असल्याचा गुंतवणूकदारांचा होरा आहे. काही दिवसांत येथील जागेचे दर अस्मानाला भिडण्याचा अंदाज व्यक्त होत आहेत. 

डहाणू : केंद्र शासनाच्या बहुप्रतीक्षित असलेल्या महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाच्या निर्मितीसाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे डहाणू तालुक्‍यातील बंदरानजीकच्या भागातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारात तेजी आल्याचे दिसून येते. गुजरात, मुंबईतील अनेक गुंतवणूकदारांनी या भागात जमीन खरेदी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या व्यवहारातील दलालांचा सुळसुळाट वाढल्याने येथील जमिनीचे भाव गगनाला भिडण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

अधिक वाचाः  कल्याण पत्रीपुलाच्या कामाला वेग, गुरुवारपर्यंत पुलावरील रात्रीची वाहतूक बंद

वाढवण बंदरनिर्मितीचा एकेक टप्पा शासनाकडून पार केला जात आहे. नुकतेच धाकटी डहाणू येथे बंदराचे जीपीएस सर्वेक्षण करण्यात आले. त्याला ग्रामस्थांनी विरोध केला असता पोलिस बंदोबस्तात सर्वेक्षण करण्यात आले. कोरोना काळातही बंदरनिर्मितीसाठी आवश्‍यक यंत्रणा सरकारने कार्यरत ठेवली आहे. परिणामी बंदरउभारणीचे काम कोरोनाची तीव्रता कमी झाल्यास अजून वेगाने होण्याची शक्‍यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन अनेक गुंतवणूकदार या भागात जमीन खरेदीसाठी तयार असल्याने दलालांमार्फत व्यवहार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

अधिक वाचाः  डोंबिवलीत वाहन चोरी करणारे त्रिकुट अटकेत, दोन बाईकसह ७ रिक्षा हस्तगत

वाढवणनजीक असलेल्या चिंचणी, वरोर, तनाशी, आसनगाव, चंडिगाव, धूमकेत, अब्राम, माटगाव, वाणगाव, बावडा, मोगरबाव, केतखाडी, धाकटी डहाणू इत्यादी गावांत जमीन खरेदी-विक्री व्यवहार करणाऱ्या दलालांची फौज जोमाने कामाला लागल्याचे दिसून येते. या बंदराच्या उभारणीनंतर जागेचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्‍यता असल्याने जमीन खरेदीसाठी हीच योग्य वेळ असल्याचा गुंतवणूकदारांचा होरा आहे. काही दिवसांत येथील जागेचे दर अस्मानाला भिडण्याचा अंदाज व्यक्त होत आहेत. 

महत्त्वाची बातमी : लोकल सर्वांसाठी सुरु करण्याच्यादृष्टीने महत्त्वाची पावलं, रेल्वे अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक

वाढवण बंदर उभारणीसाठी सरकारने हालचाली सुरू केल्याने या भागात जमिनीची खरेदी-विक्री करणाऱ्या मध्यस्थांच्या येरझारा वाढल्या आहेत; मात्र स्थानिक शेतकरी, जमीनदार भूमिपुत्रांनी कोणत्याही मोहाला, आमिषाला बळी पडू नये. कोणाच्याही भूलथापांकडे लक्ष देऊ नये. सद्‌सद्विवेकबुद्धीने योग्य निर्णय घ्यावा. 
- तानाजी तांडेल, उपसरपंच, धाकटी डहाणू.

(संपादन : वैभव गाटे)

Growth accelerates land purchase transactions in the port area


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Growth accelerates land purchase transactions in the wadhavan port area