बिया-बियांतून बहरतोय निसर्ग!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

पावसाळ्यापूर्वी जंगलात हिरवाई फुलवण्यासाठी वन्यप्रेमी मुंबईकरांनी काही वर्षांपूर्वी ‘सीडबॉल’च्या माध्यमातून नवा यशस्वी प्रयोग अमलात आणला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे पावसाळ्यातील निसर्ग अधिकच बहरून निघत आहे.

मुंबई - पावसाळ्यापूर्वी जंगलात हिरवाई फुलवण्यासाठी वन्यप्रेमी मुंबईकरांनी काही वर्षांपूर्वी ‘सीडबॉल’च्या माध्यमातून नवा यशस्वी प्रयोग अमलात आणला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे पावसाळ्यातील निसर्ग अधिकच बहरून निघत आहे. पर्यावरणप्रेमी ‘फ्रोजी’ संघ फळांच्या बिया मातीच्या आवरणात सुकवून पावसाळ्याच्या आधी मुंबई आणि नजीकच्या विविध भागांत नेऊन टाकत आहेत. दुसरीकडे, उन्हाळ्यात फळांच्या बिया जमा करून त्यांचे रोपण करण्याचे काम ‘ग्रीन अंब्रेला’ संघटनेने हाती  घेतले आहे. 

वाढत्या शहरीकरणात हिरवाई नष्ट होत आहे. मात्र, आम्ही करीत असलेल्या प्रयोगातून निसर्ग बहरण्यास हातभार लागत असल्याचा आनंद आहे, असे मत ‘फ्रोजी’चे विकास महाजन आणि ‘ग्रीन अंब्रेला’चे विक्रम येंदे यांनी व्यक्त केले. राजस्थानातील रणथंबोरमधील आदिवासी वस्तीजवळच्या फळझाडांच्या बिया गोळा करून त्या जंगलात फेकत असल्याचे महाजन यांनी वन्यजीव छायाचित्रण करताना पाहिले होते. मात्र, जंगलानजीकच्या उघड्या जमिनीवर बिया टाकल्या तर त्या सुकत असल्याने त्यातून झाडे उगवणे शक्‍य नसल्याचे महाजन यांच्या लक्षात आले. त्यावेळी जपानमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘सीडबॉल’ची माहिती त्यांना मिळाली. त्यातूनच मातीच्या आवरणात बिया टाकून ते सुकवून त्यातून ‘सीडबॉल’ बनवण्यात आले. वेगवेगळ्या भागांत महाजन आणि त्यांच्या टीमने ‘सीडबॉल’ नेऊन टाकले. 

अनेकदा आम्ही जंगलातून बिया गोळा करतो. कित्येकदा विकत घेतो. जंगलात वृक्षारोपणाला कायद्याने मनाई आहे. त्यामळे द्रुतगती मार्ग आणि महामार्गाजवळच्या भागांत आम्ही ‘सीडबॉल’ टाकतो. पावसाळ्यात मातीचे आवरण विरघळून बिया जमिनीत रुजतात. अशा पद्धतीचे सीडबॉल आम्ही इगतपुरी, नाशिक, पुणे, अलिबाग आदी भागांत टाकतो, असे महाजन म्हणाले.

सीडबॉल बनवण्याची प्रक्रिया 
माती आणि कंपोस्ट खताचे मिश्रण एकत्र करावे. त्यात पाणी घालावे. गोळा तयार होईल अशा प्रकारे मिश्रण होईल याची काळजी घ्यावी. 

वृक्षारोपणात स्थानिक वृक्षांना महत्त्व द्यावे. त्यातूनच खऱ्या अर्थाने हिरवाई कायम राहण्यास मदत होईल. 
- विक्रम येंदे, सदस्य, ग्रीन अंब्रेला

मुंबई व नजीकच्या भागांत पक्ष्यांचा सहवास आता कमी होऊ लागलाय. त्यासाठी फळझाडे आणि वृक्ष मोठ्या प्रमाणात लावणे गरजेचे आहे. 
- विकास महाजन, सदस्य, फ्रोजी

मुंबईनजीकची वृक्षसंपत्ती 
येऊर ः कुसुम, पेहारी, अलांडी, काकड, हुंब, कुंकू, वाव्हळ, बितळा, बहावा, धामण वारस, सुरंगी, लकुच, तेंदू आणि खिरणी.
तुंगारेश्‍वर ः पाडळ, बेहडा, कळंब, मोह, काळा-कुडा, सफेड कुडा, शेमट, शिवण, असाणा, कौशी, भोकर आणि अंजनी. 
कर्नाळा ः लाणा, पांगारा, पळस, काटेसावर, महारूख, बोंडारा, मोह, फालसा, टेटू, कहांडोळ, सालई, खैर आणि तोरण.
राणीबाग ः नागकेशर, बारतोंडी, करमळ, अर्जुल, नेतरी आणि धावडा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Exquisite Nature of seeds