‘फेसबुक फ्रेण्ड’कडून निवृत्त शास्त्रज्ञाला गंडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

  • फेसबुक मैत्रिणीचा निवृत्त शास्त्रज्ञाला साडेतीन लाखांचा गंडा

मुंबई : फेसबुकवरील मैत्रिणीने निवृत्त शास्त्रज्ञाला साडेतीन लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. फेसबुकवरील मैत्रिणीने आपण लंडनमधील औषध कंपनीत काम करत असल्याचे भासवून कोट्यवधींच्या कमाईचा व्यवसाय मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक केली. या प्रकरणी पवई पोलिस अधिक तपास करीत आहेत.

प्लेगची महामारी पुन्हा येणार

६७ वर्षीय तक्रारदार निवृत्त शास्त्रज्ञ असून निवृत्तीनंतर सध्या सल्लागार म्हणून काम करतात. तक्रारीनुसार १९ ऑक्‍टोबरला त्यांना फेसबुकवर रोझी मॉर्गन नावाच्या महिलेने मैत्रीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यांनी तो प्रस्ताव स्वीकारला. त्यानंतर दोघांनीही एकमेकांचे दूरध्वनी क्रमांक एकमेकांना दिले. त्यानंतर दोघेही एकमेकांसोबत चॅटिंग करू लागले. त्या वेळी मॉर्गनने त्यांना आपण औषध कंपनीत कामाला असल्याचे सांगितले. सध्या औषधी तेलाला खूप मागणी असून त्यांची कंपनी ऑस्ट्रेलिया व ब्राझीलमधून पाच हजार डॉलरमध्ये खरेदी करते. तसेच नवी दिल्लीतील डॉ. विरेंद्र शर्मा तेच तेल २५०० डॉलरने विकतात, असे मॉर्गनने सांगितले. तेच तेल कंपनीला पाच हजार डॉलरला विकून चांगला फायदा मिळवता येईल.

व्हाट्सअपमध्ये सुरू होणार हे नविन फीचर

या वेळी तक्रारदाराला मॉर्गनने नफ्यातील ७० टक्के हिस्साही देण्याचे मान्य केले. या वेळी विलियम्स अँड्रू यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. त्या वेळी विलियम्सने १०० लिटर तेल घेण्यास होकार दर्शवला. पण तीन लिटर सॅम्पल पाठवण्यास सांगितले. त्यानुसार, तक्रारदाराने दिल्लीतील शर्मा यांच्याशी संपर्क साधला. त्या वेळी पैसे जमा करण्यास तक्रारदाराला सांगण्यात आले. त्यांनी साडेतीन लाख रुपये भरल्यानंतर त्यांना तेल मिळाले नाही. त्यानंतर संशय आल्यामुळे तक्रारदाराने १५ नोव्हेंबरला या प्रकरणी पवई पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebook user deceived retired scientist