फेक TRP प्रकरण : अर्णब गोस्वामी यांचा आरोपी म्हणून समावेश करणार असाल तर आधी समन्स पाठवा - HC

सुनीता महामुणकर
Monday, 19 October 2020

फेक TRP प्रकरणी जर "रिपब्लिक टीव्ही'चे संपादक अर्णब गोस्वामी यांना एफआयआरमध्ये आरोपी म्हणून समावेश करणार असाल तर त्यांना आधी समन्स बजावून त्यांची चौकशी करावी- HC

मुंबई, ता. 19 : फेक TRP प्रकरणी जर "रिपब्लिक टीव्ही'चे संपादक अर्णब गोस्वामी यांना एफआयआरमध्ये आरोपी म्हणून समावेश करणार असाल तर त्यांना आधी समन्स बजावून त्यांची चौकशी करावी, असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने आज मुंबई पोलिसांना दिले. तसेच मुंबई पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाचा सीलबंद अहवाल दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. दरम्यान, तूर्तास  संरक्षण देण्याची गोस्वामी यांची मागणीही न्यायालयाने नाकारली. 

अर्णब गोस्वामी यांना समन्स बजावले तर ते मुंबई पोलिसांना सहकार्य करतील, अशी हमी आज त्यांच्या वतीने न्यायालयात देण्यात आली. त्यांना अद्याप पोलिसांनी आरोपी न केल्यामुळे संरक्षण देता येत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. 

महत्त्वाची बातमी : नवी मुंबईत बाजारभावापेक्षा दहा लाख रुपयांनी स्वस्त घरे; सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांचे प्रतिपादन

बोगस टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या बरोबरीने मुंबई पोलिसांनी दोन वाहिन्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. "रिपब्लिक'च्या आठ अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आले आहे. त्याविरोधात गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. आज न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. अद्याप गोस्वामी यांना या प्रकरणात आरोपी दाखवलेले नाही. सध्या तपास सुरू असून या टप्प्यावर याचिका दाखल करणे अप्रस्तुत आहे. अशा वेळी तपास कसा करायचा, असे याचिकादार कसे सांगू शकते, असा युक्तिवाद राज्य सरकार आणि पोलिस आयुक्तांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी केला. हे गंभीर प्रकरण असून आर्थिक फसवणूक आहे. तपास प्राथमिक टप्प्यात सुरू आहे. त्यामुळे सध्या कोणत्याही प्रकारचा दिलासा याचिकादाराला देऊ नये, अशी मागणी सिब्बल यांनी केली. 

याचिकेवर अंतिम सुनावणी 5 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली असून याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणीही केली आहे. 

आतापर्यंत "रिपब्लिक'च्या आठ जणांना समन्स बजावण्यात आले आहे. पोलिसांनी आकसापोटी "रिपब्लिक'विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आयुक्त मीडियामध्ये मुलाखती देऊन "रिपब्लिक'वर आरोप करत आहेत, असा युक्तिवाद गोस्वामी यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी केला. मात्र, "रिपब्लिक'सह काही वाहिन्या पोलिसांवर आरोप करून तपास प्रभावित करत आहे. त्यांच्या मीडिया ट्रायलमुळे तपासाला बाधा येत आहे, असे सिब्बल यांनी सांगितले. 

महत्त्वाची बातमी : राज ठाकरे पोहोचलेत लिलावातीमध्ये, ठाकरे कुटुंबियांसाठी भावुक क्षण

पोलिस आयुक्तांच्या मुलाखतीवरही नाराजी 

पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखतींवर न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली. संवेदनशील प्रकरणांची माहिती अधिकारी मीडियाला कसे देतात? असे न्यायालयाने विचारले. त्यावर, पोलिस आयुक्त मीडियाशी बोलणार नाहीत. This मात्र, वाहिन्यांनीही मीडिया ट्रायल चालवू नये, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली. मीडिया लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यांनी जबाबदारीने वागावे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. 

गोस्वामी यांना संरक्षण नाकारले 

पोलिसांनी आकसाने गुन्हा दाखल केला आहे. पालघर हत्याकांड संबंधित वृत्तांमुळे हा आरोप केला जात आहे, असा दावा अर्णब गोस्वामी यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी केला. पोलिस गोस्वामी यांना अटक करण्याची शक्‍यताही या वेळी व्यक्त करण्यात आली आणि न्यायालयाने त्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, अद्याप आरोपी म्हणून गोस्वामी यांचे नाव घेतलेले नाही. त्यामुळे असा दिलासा मिळू शकत नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. गोस्वामी यांना आरोपी दाखविल्यानंतर त्यांना अन्य जणांप्रमाणे समन्स बजावणे आवश्‍यक आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

fake TRP case mumbai high court asked to issue summonsed before taking any other action

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fake TRP case mumbai high court asked to issue summonsed before taking any other action