झगमगत्या सोहळ्यात फाळके पुरस्कार प्रदान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

मुंबई - वांद्रे येथील सेंट ऍण्ड्य्रुज ऑडिटोरियमच्या परिसरात ती संध्याकाळ वेगळेच रंग घेऊन आली होती. इथे वातावरणात अनोखा उत्साह होता, ढोल-ताशांचा गजर वारंवार होत होता आणि आगमन होत होतं मान्यवर सेलिब्रिटींचं. निमित्त होतं ते दादासाहेब फाळके एक्‍सलन्स ऍवॉर्डस्‌ सोहळ्याचं!

मुंबई - वांद्रे येथील सेंट ऍण्ड्य्रुज ऑडिटोरियमच्या परिसरात ती संध्याकाळ वेगळेच रंग घेऊन आली होती. इथे वातावरणात अनोखा उत्साह होता, ढोल-ताशांचा गजर वारंवार होत होता आणि आगमन होत होतं मान्यवर सेलिब्रिटींचं. निमित्त होतं ते दादासाहेब फाळके एक्‍सलन्स ऍवॉर्डस्‌ सोहळ्याचं!

चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या 148 व्या जयंतीचं औचित्य साधून एच. आर. एन्टरटेन्मेंटचे हर्ष गुप्ता, अभिनेत्री पूनम झावेर व स्माईल फाउंडेशन यांच्या वतीने या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याचं यंदाचं हे पाचवं वर्ष. या सोहळ्याला हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील बहुसंख्य तारे-तारकांनी हजेरी लावली होती. करण जोहर, दिव्या खोसला कुमार, अदिती राव हैदरी, राजकुमार राव, हीना खान, क्रिती सेनॉन, करण पटेल, शाहीद कपूर, शिल्पा शेट्टी, तमन्ना भाटिया, तुषार कपूर, वैभव तत्त्ववादी, पूजा सावंत, राणा दुगाबत्ती, सुमोना चक्रवर्ती, कार्तिक आर्यन, आहना कुमरा, सिमी गरेवाल असे अनेक तारे-तारका रेड कार्पेटवर साक्षात अवतरले होते.

"बिग बॉस' या रिऍलिटी शोमधील एंटरटेनिंग परफॉर्मन्ससाठी पुरस्कार मिळालेली हीना खानचा आनंद गगनात मावत नव्हता. "गोलमाल रिटर्न्स' चित्रपटात सर्वोत्कृष्ट विनोदी भूमिकेसाठी पुरस्कार मिळालेला तुषार कपूर म्हणाला की, हा पुरस्कार मिळणं ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा या शोमधील विनोदी भूमिकेसाठी सुमोना चक्रवर्तीला पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

रणवीर सिंगला बेस्ट ऍक्‍टर पीपल चॉईस हा पुरस्कार "पद्मावत' चित्रपटासाठी मिळाला. तसंच शाहीद कपूरला "पद्मावत' चित्रपटासाठी बेस्ट ऍक्‍टर म्हणून पुरस्कार देण्यात आला. या वेळी शाहीद म्हणाला, "हा चित्रपट खूप खास होता. या चित्रपटातील माझी भूमिका खूप कठीण होती आणि त्यासाठी मला हा पुरस्कार देण्यात आलाय. त्यामुळे मी सर्वांचे खूप आभार मानतो.' दिव्या कुमार खोसला कुमारनेही तिच्या बुलबुल लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.

छोट्या पडद्यावर रिऍलिटी शोसाठी परीक्षक म्हणून उत्तम कामगिरी केल्याबद्दल रिऍलिटी शोची बेस्ट जज म्हणून अभिनेत्री शिल्पा शेट्टीला गौरवण्यात आलं. तिने या पुरस्काराचं श्रेय आपल्या टीमला दिलं. करण जोहरचा "कॉफी विथ करण' बेस्ट टॉक शो ठरला. अभिनेत्री क्रिती सेनॉन हिला आउटस्टॅण्डिंग परफॉर्मन्स ऑफ द ईयर हा पुरस्कार "बरेली की बर्फी' या चित्रपटासाठी मिळाला; तर दिग्दर्शिका अश्‍विनी अय्यर तिवारी यांना "बरेली की बर्फी'साठीच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिकेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजकुमार रावलाही "न्यूटन' चित्रपटासाठी आउटस्टॅण्डिंग परफॉर्मन्स ऑफ द ईयरचा पुरस्कार देण्यात आला.

सिमी गरेवाल यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट हा पुरस्कार देण्यात आला, तर संजय दत्तला प्राईड ऑफ इंडियन सिनेमा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मराठीत अभिनेता वैभव तत्त्ववादीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर "लपाछपी' चित्रपटासाठी पूजा सावंत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी पुरस्कार देण्यात आला. अनुराग पांडेने या सोहळ्याचं अतिशय खुमासदार पद्धतीने सूत्रसंचालन केलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: falake award distribution karan johar shahid kapoor