Mumbai : भाज्यांच्या घाऊक दरात घसरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vegetables

Mumbai : भाज्यांच्या घाऊक दरात घसरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशी : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक वाढल्‍याने दरात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. भाज्यांच्या दरात २० ते १५ टक्‍क्‍यांनी घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

गेल्‍या महिनाभरापासून भाज्यांच्या दरात वाढ झाली होती. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली होती. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आवक घटल्‍याने भाज्यांच्या दरात वाढ झाली होती. किरकोळ बाजारात तर काही भाज्यांनी शंभरी पार केली होती. आता भाजीपाल्‍याच्या उत्‍पादनास पोषक वातावरण असल्यामुळे आवक वाढल्‍याने घाऊक दरात घसरण झाली आहे; मात्र इंधनाच्या वाढत्या दरामुळे किरकोळ बाजारात चढ्या दरानेच भाजीविक्री केली जात आहे.

पंधरा दिवसांपूर्वी कोंथिबीरची जुडी घाऊक बाजारात ३५ ते ४५ रुपयांना मिळत होती; तर किरकोळ बाजारात ७० ते ८० रुपयांना मिळत होती. त्यामुळे अनेकांच्या भाजीमधून कोथिंबीर गायब झाली होती. मात्र आता भावात घसरण होऊन १४ ते २० रुपयांना जुडी मिळत आहे. शेपू, मेथीच्या दरामध्येही घसरण झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात १०० रुपये किलोने मिळणारी गवार आता ४० ते ५० रुपयाने मिळत आहे. ढोबळी मिरची, कारली, घेवडा, भेंडीच्या दरातही घसरण झाली आहे. वाटाण्याचे दर मात्र स्थिर असून १०० ते १४० रुपये किलोने मिळत आहे.

सध्या भाज्यांना पोषक वातावरण असल्‍याने आवक वाढली आहे. त्यामुळे दरांमध्ये घसरण झालेली आहे.

- के. डी. मोरे, भाजीपाला व्यापारी

दिवाळीच्या आधी भाजीचे दर खूप वाढले होते. त्यामुळे कोणत्या भाज्या घ्याव्यात, असा प्रश्न पडायचा; मात्र आता भाज्‍या स्‍वस्‍त झाल्‍याने दरात घसरण झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

- पूजा काळे, गृहिणी

इराणी कांद्याकडे पाठ

देशी कांद्याची घाऊक बाजारात आवक वाढून दरही ५ रुपयांनी कमी झाल्याने आयात केलेल्‍या इराणचा कांद्याच्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे हा कांदा एपीएमसी गोदामातून परस्पर इतर राज्यात पाठविला जात आहे.एपीएमसी बाजारात देशी कांदा पन्नाशी गाठेल, अशी शक्यता होती. त्यामुळे स्वस्त असलेला इराणचा कांदा आयात करण्यात आला होता. गेल्या आठवड्यात हा कांदा बाजारात आला. त्या वेळी देशी कांदा ३० रुपये तर इराणचा कांदा २० रुपयांनी उपलब्‍ध होता. मात्र देशी कांद्याची आवक वाढल्‍याने दर पाच रुपयांनी कमी होत २८ ते २९ रुपयांवर उपलब्ध आहे. तर इराणी कांदा २० ते २५ रुपयांवर विक्री होत आहे. इराणमधून मागविलेल्या कांद्याला मागणी नाही व भाव मिळत नसल्याने हा कांदा आता दिल्ली आणि गुजरात, उत्तर प्रदेशात पाठवण्यात येत आहे. गोदामात २९ कंटेनर कांदा दाखल झाला होता, अशी माहिती व्यापारी अशोक वाळूंज यांनी दिली.

loading image
go to top