रोह्यातील शेतकऱ्याची कमाल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

हा येथील प्रगतशील शेतकरी अनंत मगर यांनी अशा बिकट परिस्थितीतही कलिंगडाचे उत्पादन घेतले असून बुधवारी (ता.22) पहिली तोड करण्यात येणार आहे.

रोहा : परतीचा पाऊस लांबल्याने रायगड जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांचे उत्पादनही लांबणीवर पडले आहे. परंतु रोहा येथील प्रगतशील शेतकरी अनंत मगर यांनी अशा बिकट परिस्थितीतही कलिंगडाचे उत्पादन घेतले असून बुधवारी (ता.22) पहिली तोड करण्यात येणार आहे. या दिवशी 300 ते 400 किलो फळे मिळण्याची शक्‍यता आहे. 

रायगड जिल्ह्यात सुमारे 4 ते 5 हजार हेक्‍टरवर कलिंगडाची लागवड करण्यात येते. त्यापैकी रोहा तालुक्‍यात सुमारे 300 ते 350 हेक्‍टरचा समावेश आहे. रोह्यातील शेतकरी ऑक्‍टोबरमध्ये नांगरणी आणि अन्य मशागत करून नोव्हेंबरमध्ये बियाणे लागवड करतात. यंदा परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने लागवड महिनाभर उशिराने झाली. त्यामुळे पीकही महिनाभर उशिराने येणार आहे. परंतु मगर यांनी या पिकाची योग्य देखभाल केली. किडींचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात झाला असतानाही त्यावर अनेक उपाय करून नियंत्रण मिळवले. आता त्यांच्या शेतात 3 ते 4 किलोची फळे लागली आहे. त्याची पहिली तोड बुधवारी होणार आहे. 

आता काय बाेलणार? : थाळीसाठी आधारसक्ती

मगर यांनी वाशीगाव- महादेववाडी येते भाडेपट्ट्यावर जमीन घेतली आहे. त्यापैकी 30 एकरवर कलिंगड लागवड केली आहे. या मोसमात त्यांना 10 ते 15 टन उत्पादन अपेक्षित आहे. प्रति टन 8 ते 12 हजार रुपये भाव मिळण्याची शक्‍यता त्यांनी व्यक्त केली. 

गोडव्यामुळे प्रसिद्ध 
रायगड जिल्ह्यातील शेतकरी पाण्याच्या जागा, ओहोळ, तलाव आणि नदीकाठी कलिंगडाची शेती करतात. हिवाळ्यातील थंड हवामानाचा फायदा घेत या पिकाच्या लागवडीस प्राधान्य देतात. रोहा तालुक्‍यात तयार होणारे कलिंगड गोड, चवदार आणि टिकाऊ असल्याने व्यापारीही मोठ्या प्रमाणात येथून फळे खरेदी करतात. मुंबई, ठाण्यासह अनेक शहरात ती विक्रीसाठी घेऊन जातात. 

या वर्षी परतीच्या पावसामुळे लागवड उशिरा झाल्याने महिनाभर तरी उत्पादन मिळणार नाही. मात्र मगर यांनी धोका पत्करून पाऊस सुरू असतानाच कलिंगडाची लागवड केली असल्याने त्यांना लवकर उत्पादन मिळाले आहे. हे कौतुकास्पद आहे. 
- सुरेश शेणॉय, प्रगतशील शेतकरी 

कलिंगडांची लवकर लागवड केली. आधुनिक पद्धतीने मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचन केले. औषधे, खते प्रमाणात वापरले. त्यामुळे वेळेवर कलिंगड काढणीस आले आहे. 
- अनंत मगर, प्रगतशील शेतकरी, रोहा 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Anant Magar succeeds

फोटो गॅलरी