गोदाम आहे, पण तेही धूळ खात

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 January 2020

अस्मानी संकटामुळे भात उत्पादनाचे नुकसान पदरात पडलेल्या शेतकऱ्यांपुढे आता भातखरेदी केंद्र नसल्याने हाती आलेले विक्रीची समस्या निर्माण झाली आहे. महाड तालुक्‍यात गोदाम नसल्याने भातखरेदी केंद्र अद्यापही सुरू झालेले नाही.

महाड (बातमीदार) : अस्मानी संकटामुळे भात उत्पादनाचे नुकसान पदरात पडलेल्या शेतकऱ्यांपुढे आता भातखरेदी केंद्र नसल्याने हाती आलेले विक्रीची समस्या निर्माण झाली आहे. महाड तालुक्‍यात गोदाम नसल्याने भातखरेदी केंद्र अद्यापही सुरू झालेले नाही. दुसरीकडे मात्र तालुक्‍यातील कोळोसे येथे दीड कोटी रुपये खर्च करून नव्याने बांधलेले धान्य गोदाम तीन वर्षे धूळ खात पडून आहे. त्यामुळे या गोदामात भातखरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी रायगड जिल्हा शेतकरी संघटनेने पालकमंत्री अदिती तटकरे व खासदार सुनील तटकरे यांच्याकडे केली आहे.

भातखरेदीसाठी सरकारने १८ रुपये ०५ पैसे प्रतिकिलो हमीभाव तालुका पातळीवर गोदामे उपलब्ध करून द्यायची आहेत. महाड तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी शहरातील खरेदीविक्री संघाच्या गोदामात भातखरेदी केली जात होती; परंतु काही वर्षांपासून येथील गोदामात भातखरेदी बंद झाली आहे. त्यामुळे शेतकरी पडेल त्या दरात व्यापाऱ्यांना भात देत आहेत. परिणामी, हमीभावाचा उद्देश सफल होताना दिसत नाही. तालुक्‍यातील वसाप या शहरापासून २२ किमी अंतरावर असलेल्या गावात भातखरेदी केंद्र दोन वर्षांपासून सुरू करण्यात आले. हे अंतर जास्त असल्याने शेतकरी संघटनेने कोळोस येथे असलेल्या सरकारी गोदामात खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी मागील वर्षीही केली होती; परंतु तरीही यावर्षी शेतकऱ्यांना गोदामासाठी पुन्हा मागणी करावी लागत आहे.

आरोग्‍य केंद्राचेच आरोग्‍य बिघडते तेव्हा... काय होते ते वाचा

नाबार्ड अंतर्गत राज्यात रास्तभाव दुकानांसाठी येणारे धान्य साठवण्यासाठी काही ठिकाणी गोदामे बांधण्यात आली. त्यातूनच महाडपासून पाच किमीवर असलेल्या कोळोसे या ठिकाणी तीन वर्षांपूर्वी नवे सरकारी धान्य गोदाम बांधण्यात आले. गोदामाची गरज आहे की नाही याची खातरजमा न करता निधी खर्च करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून कोळोसे गावातील सरकारी जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवी इमारत बांधलेली आहे. त्यानंतर गोदाम महसूल विभागाने ताब्यात घेतल्यापासून ते विनावापर पडून आहे. 

अरेरे...जाळ्यात मासोळी गावातचं नाय... 

गोदामाची धान्य साठवणूक क्षमता १ हजार ८० मेट्रिक टन इतकी आहे. तरीही या नव्या गोदामात धान्याचा एकही दाणा साठवला गेलेला नाही. त्यामुळे हे गोदाम भातखरेदी केंद्रासाठी द्यावे, अशी मागणी रायगड जिल्हा शेतकरी संघटनेचे सल्लागार वसंत खेडेकर यांनी केली आहे. याबाबत महाड तालुका पुरवठा अधिकारी यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही

मागील वर्षी या गोदामाच्या मागणीसाठी उपोषण केले होते; परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेतकऱ्यांनी भात पिकवून त्याची खरेदी सरकारी पातळीवर होत नसेल, तर सरकार शेतकऱ्यांचे हित पाहत आहे, असे कसे म्हणता येईल. 
- वसंत खेडेकर, रायगड जिल्हा शेतकरी संघटना सल्लागार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer waiting for Rice Center