बहाडोलीतील प्रसिद्ध जांभळाच्या भौगोलिक मानांकनासाठी शेतकऱ्यांचा पुढाकार

नविद शेख
Friday, 2 October 2020

बहाडोली गावातील जांभूळ पिकाला भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी (GI) लागणारी प्राथमिक माहिती आणि आवश्‍यक दस्तावेजाबाबतची माहिती तरुण वैती यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.

मनोर : पालघर तालुक्‍यातील वैतरणा नदी किनारच्या बहाडोली गावातील प्रसिद्ध जांभळाला भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. जांभूळ उत्पादक शेतकरी गटातील शेतकऱ्यांनी जांभूळ पिकाला भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी गुरुवारी (ता.1) सभा आयोजित केली होती. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना भौगोलिक मानांकनाबाबत पालघरचे उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप नेरकर, तालुका कृषी अधिकारी तरुण वैती यांनी मार्गदर्शन केले. 

नक्की वाचा : परिसरातील स्वच्छता तर होईल, मानसिक स्वच्छतेचे काय? महिलांच्या सुरक्षिततेबाबत मनसेचा सवाल

बहाडोली गावातील जांभूळ पिकाला भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी (GI) लागणारी प्राथमिक माहिती आणि आवश्‍यक दस्तावेजाबाबतची माहिती तरुण वैती यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिली. जांभळाच्या झाडाचा इतिहास, जांभूळ फळाचे वैशिष्ट, जांभूळ लागवड असलेल्या परिसराचा नकाशा, जांभूळ महोत्सवाच्या आयोजनाबाबतची वर्तमानपत्रातील कात्रणे, कृषी अधिकारी आणि शास्त्रज्ञांच्या जांभूळ बागेतील भेटींची छायाचित्रे आदी माहिती शेतकऱ्यांनी गटामार्फत एकत्र करणे गरजेचे आहे. तसेच भौगोलिक मानांकनाच्या प्रक्रियेदरम्यान लागणारी रक्कम शेतकऱ्यांनी गोळा करण्याचे आवाहन त्यांनी केले. भौगोलिक मानांकनासाठी आवश्‍यक माहितीसह प्रस्ताव सादर करण्यासाठी तज्ज्ञांची नेमणूक करून गावामध्ये जांभूळ फळपिकाच्या लागवडीत वाढ करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

हे ही वाचा : महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तनप्रकरणी डॉ. प्रदीप जाधव यांच्यावर गुन्हा

"विकेल ते पिकेल' या संकल्पनेवर आधारित जांभूळ आणि भाजीपाला विक्रीबाबत उपविभागीय अधिकारी दिलीप नेरकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यापारी दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांना पिकाचा योग्य मोबदला मिळणार नाही. शेतकरी स्वयंसहायता गट, महिला बचत गट यांच्या सहकार्याने जांभूळ आणि भाजीपाला विक्री करणे शक्‍य आहे. यावेळी शेतकरी गटाचे अध्यक्ष प्रकाश किनी, सचिव कल्पेश कुडू, मंडळ कृषी अधिकारी नरगुलवार, कृषी पर्यवेक्षक जगदीश पाटील आणि कृषी देविका नीलम लहांगे आणि जांभूळ उत्पादक शेतकरी उपस्थित होते. 

मोठी बातमी : ठाण्यातील आर्केडिया मॉलमध्ये भीषण आग, सहा दुकानं भस्मसात

विकेल ते पिकेल - 
"विकेल ते पिकेल' या संकल्पनेवर आधारित जांभूळ पिकाचा क्‍लस्टर तयार केला असल्याने विविध योजनांचा समावेश यात करण्यात आला आहे. यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक व गटामार्फत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून यावेळी करण्यात आले. https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Home/Index या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. 

(संपादन : वैभव गाटे)

Farmers initiative for geographical indicator of famous java plam of Bahadoli


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers initiative for geographical indicator of famous java plam of Bahadoli