बळिराजाला 21 हजार कोटींची कर्जमाफी; 30 लाख 57 हजार शेतकऱ्यांना लाभ

संजय मिस्कीन
बुधवार, 25 डिसेंबर 2019

कर्जमाफीवर शिक्कामोर्तब 
- दोन लाखांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ 
- दोन लाखांच्या वरील कर्जासाठी स्वतंत्र योजना 
- नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी लवकरच बक्षीस योजना 
- मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या कर्जमाफीच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने अखेर आज शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीवर शिक्‍कामोर्तब केले. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या या प्रस्तावाला सर्व मंत्र्यांनी एकमताने सहमती दिली. राज्यातील 30 लाख 57 हजार शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यासाठी 21 हजार 216 कोटी रुपयांच्या खर्चाला आज या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. 

(VIDEO) :   भाजी विक्रेत्यांनी घेतलीये मुंबईकरांची सुपारी ? 

1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या एकापेक्षा जास्त कर्जखात्यात अल्पमुदत पीककर्ज व अल्पमुदत पीककर्जाच्या पुनर्गठित कर्जाची 30 सप्टेंबर 2019 रोजी असलेली थकबाकी व परतफेड न केलेली रक्कम 2 लाखांपेक्षा कमी असल्यास अशा सर्व खात्यास 2 लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. 

महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतच्या कर्जाला पूर्ण माफी देण्याची घोषणा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात करण्यात आली होती. "महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजना' असे नामकरण केलेल्या योजनेवर आज मंत्रिमंडळाच्या मान्यतेची मोहोर उमटविण्यात आली. 

धक्कादायक :  ...म्हणून त्या महिलेला कपडे बदलताना बाहेर काढले 

राज्यातील पूर्वीच्या कर्जमाफीचा आढावा घेतल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांसाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे. पूर्वीच्या कर्जमाफीतून काही शेतकऱ्यांकडे दोन लाखांच्या आतील कर्ज शिल्लक असेल, तर त्यांचेही सर्व कर्ज माफ करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. 

दरम्यान, दोन लाखांच्या वरील थकबाकीदार शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळावा, यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली. अशा दोन लाखांवरील कर्जदार शेतकऱ्यांसाठी लवकरच नवीन योजना अमलात आणली जाईल, यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला. ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरले असेल अशा शेतकऱ्यांनाही विशेष बक्षीस योजना लवकरच जाहीर करण्यावर या वेळी चर्चा झाली. त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे बक्षीस योजनेचा आराखडा महिनाभरात तयार करून तो जाहीर करण्यात येणार आहे. 
मागील सरकारने अडीच हेक्‍टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंतची कर्जमाफी योजना राबविली होती. आता नव्या महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेत कोणत्याही अटी व शर्ती नसून सरसकट दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे.

कर्जमाफीवर शिक्कामोर्तब 
- दोन लाखांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ 
- दोन लाखांच्या वरील कर्जासाठी स्वतंत्र योजना 
- नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी लवकरच बक्षीस योजना 
- मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या कर्जमाफीच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता 

आकडेवारी 
2 लाख रुपये 
सरसकट कर्जमाफीची रक्कम 
--- 
30 लाख 57 हजार रुपये 
लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ 
--- 
21 हजार 216 कोटी रुपये 
खर्चाला मंजुरी 

WebTitle : farmers of Maharashtra get loan wavier of 21216 crore


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers of Maharashtra get loan wavier of 21216 crore