नॅशनल शेम! दिल्लीत जे काही घडलं त्याचा शिवसेनेकडून ठाकरी भाषेत समाचार

तुषार सोनवणे
Tuesday, 26 January 2021

गणतंत्र दिनाच्या दिवशी ( Republic day 2021 ) दिल्लीत हिंसक आंदोलनं होणं ही देशासाठी लज्जास्पद घटना असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुंबई -  गेल्या दोन महिण्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ( Farmers Protest ) आज हिंसक वळण मिळाले. गणतंत्र दिनाच्या दिवशी ( Republic day 2021 ) दिल्लीत हिंसक आंदोलनं होणं ही देशासाठी लज्जास्पद घटना असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. दिल्लीत झालेल्या हिंसक आंदोलनानंतर ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते

काय म्हणाले संजय राऊत?

''दिल्लीत आज जे काही झालंय ते 'नॅशनल शेम' आहे. आज गणतंत्र दिवस आहे, पूर्ण देशासह, जगाचं लक्ष भारताच्या गणतंत्र दिवसाकडे असतं. लष्कराची ताकद आणि देशाच्या विविधतेच्या संस्कृतीचं दर्शन यादिवशी होतं. परंतु आज दुपारनंतर आंदोलक आक्रमक झाले. त्यानंतर देशाने आणि जगाने जे काही पाहिलं ते आंदोलक आणि केंद्र सरकार दोन्हीसाठी शरमेची बाब होती.  दोन महिण्यांपासून शांतीप्रिय पद्धतीने सुरू असलेले आंदोलन, आज एव्हढ्या मोठ्या प्रमाणात आक्रमक आणि हिंसक का झाले? ही सरकारची जबाबदारी नाही का? कायदा लोकांसाठी बनला आहे ना? मग लोकांना मान्य नसेल तर, त्यावर फेरविचार का नाही करत? लाल किल्यावर झालंय ते आपल्या देशासाठी शरमेची बाब आहे''.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

''आजच्या दिवशी ही घटना घडायला नको होती. शेतकरी आंदोलनावर डाग लागला आहे असं मला वाटतं. त्याला जबाबदार फक्त आंदोलकच नाही तर,  सरकारसुद्धा आहे. दिल्लीतील कायदा सुव्यवस्था विस्कळीत झाली आहे. याबाबत कोणाचा राजीनामा घ्यावा. जे झालं त्याचा तीव्र शब्दात निषेध... दिल्लीत जे घडलं त्यांचे पडसाद देशात पडू शकतात. त्यामुळे देशात आणिबाणीची परिस्थिती तयार होऊ शकते. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा आवाज ऐकावा असं मला वाटतं.  परंतु आंदोलक शेतकऱ्यांनी जे काही आज दिल्लीत केलं त्यांचाही आम्ही निषेध करतो. ही घटना दुःखद आणि वेदनादायी आहे.''  असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

farmers protest delhi tractor rally ShivSena condemn against violent agitation in Delhi

----------------------------------

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers protest delhi tractor rally ShivSena condemn against violent agitation in Delhi