Farmers protest | शेतकरी मोर्चाला संबोधित करण्याचे शिवसेनेला निमंत्रण

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 24 January 2021

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसबरोबरच शिवसेनेलाही निमंत्रण देण्यात आले आहे.

मुंबई  : मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसबरोबरच शिवसेनेलाही निमंत्रण देण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतर्फे मोर्चाला संबोधित करावे, अशी आमची इच्छा सेना नेतृत्वाकडे व्यक्त केल्याची माहिती कम्युनिस्ट नेते डॉ. ढवळे यांनी "सकाळ'ला दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या मोर्चाला संबोधित करणार आहेत.

कृषीविषयक कायद्याच्यानिषेधार्थ नाशिकहून निघालेला हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानात धडकला. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चाद्वारे कृषी कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दिला जाणार आहे. 26 जानेवारीला आझाद मैदान येथे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर मागण्याचे निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना देण्यात येणार आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

नाशिकच्या गोल्फ क्‍लब मैदानातून निघालेला हा मोर्चा सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कसारा, भिवंडी मार्गे मुंबईतील आझाद मैदानात धडकला. हजारो शेतकरी ट्रक,टेम्पो, चारचाकी, दुचाकीने मोर्चात सहभागी झाले होते. शेतकरी विरोधी तिन्ही कायदे रद्द करण्याबरोबरच शेतमालाला पुरेसा मोबदला देणारा हमीभाव देण्याची तरतूद असलेला कायदा करावा, ही प्रमुख आमची प्रमुख मागणी असल्याचे अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांनी सांगितले. आझाद मैदानात हा मोर्चा तीन दिवस मुक्कामी असणार आहे. मंगळवारी (ता. 26) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्यातील प्रमुख नेते मोर्चात सहभागी होतील, अशी माहिती मोर्चाच्या संयोजकांनी दिली. 

Farmers protest Invitation to ShivSena to address Shetkari Marcha

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers protest Invitation to ShivSena to address Shetkari Marcha