मुद्रा, तुझा वाढदिवस कोरोनाचे सावट दूर झाल्यावरच! 

शर्मिला वाळुंज
रविवार, 12 एप्रिल 2020

कोरोनाला लढा देण्यासाठी डॉक्‍टर, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आणि पोलिस तहान-भुकेबरोबरच नातीगोती विसरून झोकून देऊन काम करीत आहेत. अशांपैकीच एक आहेत दिव्यात राहणारे गौरव चव्हाण. कोरोनाचे सावट संपल्यावरच आपल्या चिमुकलीचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचा त्यांचा निर्धार आहे. 

ठाणे  ः मुलीचा पहिला वाढदिवस जवळ आला आहे. त्याचे जल्लोषात सेलिब्रेशन करायचे आहे. गावच्या गाडीचे बुकिंगही झाले आहे... पण कोरोनाच्या संकटामुळे सर्वच चित्र बदलले. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या पित्याने कर्तव्याला प्राधान्य देत काळजावर दगड ठेवत एक निर्धार केला आणि मुलाल भावनिक साद घातली... मुद्रा, आता तुझा पहिला वाढदिवस कोरोनाचे सावट दूर झाल्यावरच! असे म्हणत त्याने स्वतःला कामात झोकून दिले आहे.
 
हे वाचलं का? ः बाळाला वाचवण्यासाठी डाॅक्टरांचा संघर्ष

कोरोनाला लढा देण्यासाठी डॉक्‍टर, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, पोलिस आणि समाजसेवकांपासून काही जागरूक नागरिक तहान-भुकेबरोबरच नातीगोती विसरून झोकून देऊन काम करीत आहेत. अशांपैकीच एक आहेत दिव्यात राहणारे गौरव चव्हाण. मेट्रोपॉलिस लॅबमध्ये ते काम करतात. कोरोनाच्या संकटातही त्यांची सेवा अथक सुरू आहे. दोन आठवडे ते कुटूंबापासून दूर आहेत. त्यांच्या लाडक्‍या छकुलीचा पहिला वाढदिवस 24 एप्रिलला आहे. परंतु कोरोनाचे सावट आणि आपल्यामुळे कुटुंबालाही त्रास होऊ नये म्हणून पत्नी तिच्या माहेरी धाडले आहे. सोबत त्यांची मुलगी मुद्राही आहे.

महत्त्वाचे ः ठाणे जिल्ह्यात रेशनिंग धान्याचा तुटवडा

"सध्याच्या वातावरणात कुटुंबापासून दूर राहण्याने त्रास होतोच आहे, परंतु त्यांच्या सुरक्षिततेसाठी ते गरजेचे आहे. कोरोनाचे संकट दूर होताच मुलीचा वाढदिवस संपूर्ण कुटुंबासोबत थाटामाटात साजरा करू,' असे गौरव  सांगतात. 

गौरव मूळचे रत्नागिरीचे. त्यांनी बी. एसस्सी. पदवी मिळवली असून पाच वर्षे ते विद्याविहारमधील मेट्रोपोलिस लॅबमध्ये काम करीत आहेत. कोरोनाबाधित आणि संशयित रुग्णांचे नमुने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविले जात आहेत. त्यांचे प्रमाण एवढे आहे की कर्मचाऱ्यांवरीही कामाचा प्रचंड बोजा आहे. बारा-बारा तास काम करावे लागत आहे. त्याविषयी गौरव सांगतात, की लॅबमध्ये काम करीत असल्याने आम्हालाही संसर्गाचा धोका आहे. त्यामुळे कुटुंबापासून लांब राहण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे माझी 11 महिन्यांची मुलगी आणि पत्नीला तिच्या माहेरी ठाण्याला पाठवले. 

तुम्हीही घरीच राहा... 
पोलिस, डॉक्‍टर, परिचारिका, लॅबमध्ये काम करणारे कर्मचारी आदी अनेक नागरिक इतरांसाठी स्वतःचा जीव धोक्‍यात घालून काम करीत आहेत. जनतेनेही त्याचे भान राखत काळजी घेत घरात सुखरूप रहावे. कोरोनाची साखळी तोडण्यास तोच एक पर्याय असून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही गौरव यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father who was involved in the investigation of Corona, is determined to celebrate his daughter's first birthday soon after