घाटकोपर, मुलुंड, विक्रोळी, पवई परिसरात गॅस गळतीच्या तक्रारी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अनिश पाटील
Sunday, 18 October 2020

मुंबईतील अनेक भागांतील रहिवाशांकडून शनिवार संध्याकाळपासून गॅस गळतीच्या तक्रारी आल्या. पूर्व उपनगरातील काही परिसरात गॅस गळतीतून दुर्गंधी पसरल्याचे वृत्त शनिवारी वाऱ्यासारखे पसरले. या बातमीमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मुंबई:  मुंबईतील अनेक भागांतील रहिवाशांकडून शनिवार संध्याकाळपासून गॅस गळतीच्या तक्रारी आल्या. पूर्व उपनगरातील काही परिसरात गॅस गळतीतून दुर्गंधी पसरल्याचे वृत्त शनिवारी वाऱ्यासारखे पसरले. या बातमीमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तपासणीत मात्र कोणतीही वायू गळती आढळून आलेली नाही. मुंबईत वायू गळती होत असल्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत.

शनिवारी  सायंकाळी साडेचारच्या सुमारास गोवंडी, मुलुंड, घाटकोपर, पवई परिसरात गॅस गळतीची दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी येथील नागरिकांनी पालिकेच्या आपत्कालीन विभागात फोन करून दाखल केल्या. यानंतर पालिकेने तातडीने संबंधित प्रकाराचा तपास केला. मात्र दोन तासांतच हा प्रकार बंद झाला. 

दरम्यान, आपत्कालीन स्थितीसाठी पालिकेने अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीमसह यंत्रणा तैनात ठेवण्यात आल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त प्रभात रहांगदळे यांनी दिली.

अधिक वाचाः  केईएम-नायरमध्ये 163 जणांना कोव्हिशील्ड लस, अद्याप दुष्परिणाम नाही

मुंबईच्या पूर्व उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड परिसरात अचानक सायंकाळच्या सुमारास गॅस गळतीची दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांची घबराट उडाली. रहिवासी-दुकानदार बाहेर आले. पालिकेच्या आपत्कालीन  विभागात याबाबत सुमारे 10 दूरध्वनी आले. यानंतर तातडीने संबंधित विभागात पालिकेच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. यामध्ये ‘हॅजमॅट व्हॅन’, ‘गॅस डिटेक्टर’च्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. मात्र कोणत्याही ठिकाणी गॅसगळती आढळली नाही. त्यामुळे संबंधित गॅस दुर्गंधीबाबत नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे. 

अधिक वाचाः  मुंबईत 2 टक्क्यांनी वाढले रूग्ण, मुख्यमंत्र्यांना चाचण्या वाढीसाठी फडणवीसांचे पत्र

दरम्यान, संबंधित भागात जूनमध्येही असा प्रकार घडला होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्यही अशीच घटना घडली होती. मात्र संबंधित भागातील कोणत्याही गॅस कंपनीने गॅस गळती झाल्याचे स्पष्ट केले नव्हते. शिवाय पालिकेलाही गॅस गळती सापडली नव्हती. त्यामुळे गॅस दुर्गंधीबाबत गूढ निर्माण झाले आहे.

-----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Fear atmosphere due news gas leak ghatkopar mulund vikhroli powai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fear atmosphere due news gas leak ghatkopar mulund vikhroli powai