शुल्क नियंत्रण कायदा धाब्यावर; साने गुरुजी शाळेने पाहिलीचे शुल्क वाढवले; पालकांमध्ये संताप

तेजस वाघमारे
Sunday, 9 August 2020

शाळा शुल्क नियंत्रण कायदा धाब्यावर बसवत साने गुरुजी इंग्लिश हायस्कुल दादर या शाळेने इयत्ता पाहिलीची शुल्कवाढ केली आहे. कोरोना महामारीच्या काळात शुल्कवाढ करू नये असे शिक्षण विभागाचे स्पष्ट आदेश असतानादेखील या शाळेने शुल्कात वाढ केली आहे.

मुंबई: शाळा शुल्क नियंत्रण कायदा धाब्यावर बसवत साने गुरुजी इंग्लिश हायस्कुल दादर या शाळेने इयत्ता पाहिलीची शुल्कवाढ केली आहे. कोरोना महामारीच्या काळात शुल्कवाढ करू नये असे शिक्षण विभागाचे स्पष्ट आदेश असतानादेखील या शाळेने शुल्कात वाढ केली आहे. त्याचप्रमाणे पालक - शिक्षक समितीकडून प्रस्ताव नाकारल्यानंतर देखील शाळेने शुल्क वाढीचा निर्णय घेतल्यामुळे पालकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.

जीवावर उदार होऊन आरोग्यसेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांना तीन महिण्यापासून वेतनच नाही; BMCच्या कूपर रुग्णालयातील प्रकार 

राज्यात कोरोनामुळे सर्व उद्योगधंदे आणि कार्यालय बंद असल्यामुळे नागरिकांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कोणत्याही शाळांनी शुल्क वाढवू नये असे आदेश दिले होते. असे असताना दादरमधील भिखोबा वामन पाठारे मार्ग येथील साने गुरुजी इंग्लिश हायस्कुलने पहिलीच्या प्रवेशासाठी शुल्कवाढ केली आहे. विशेष म्हणजे पालक आणि शिक्षक समितीने वाढीव शुल्काचा प्रस्ताव बैठकीत नाकारला होता. असे असताना शाळेने कायद्याच्या विरोधात जाऊन पहिलीच्या वर्गाची शुल्कवाढ केली आहे. तसेच पहिली ते पाचवी आणि सहावी ते दहावीच्या इयत्तेसाठी दोन पालक - शिक्षक समिती बनवली आहे. एका शाळेत केवळ एकच शिक्षक - पालक समिती स्थापनेची परवानगी असते. त्यामुळे शाळेने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम 2011 याचे उल्लंघन केले आहे, असा आरोप पालकांनी केला आहे.  पालक - शिक्षक समितीने शुल्कवाढ प्रस्तावाला नकार दिला असतांनादेखील शुल्कवाढ केल्यामुळे शाळेच्या या निर्णया विरोधात पालकांनी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे.

 

शाळेने गेल्या वर्षीचे शुल्क पुढील वर्षासाठी कायम ठेवले आहे. संस्थेने कोणतीही शुल्कवाढ केलेली नाही.

- मोहन मोहाडीकर -
संस्थाचालक, साने गुरुजी शाळा

-------------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On fee control law from school; Sane Guruji School increased the fees