
पनवेल, मानसरोवर, खांदेश्वरमध्ये कारवाई करण्याची मागणी
रेल्वेस्थानकात फेरीवाल्यांचे बस्तान
पनवेल : पूर्वी केवळ मुंबई आणि मुंबईच्या उपनगरी रेल्वेस्थानकात दिसणाऱ्या फेरीवाल्यांनी हार्बर मार्गावरील रेल्वेस्थानकांवरही बस्तान मांडण्यास सुरुवात केली आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील खारघर, मानसरोवर, खांदेश्वर आणि पनवेल रेल्वेस्थानकाबाहेरील ५० मीटरच्या अंतरावर फेरीवाले बिनदिक्कत व्यवसाय करीत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दहा मिनिटांचं मौन आंदोलन आणि दीपिकाचा मास्टरस्ट्रोक...
फेरीवाल्यांकडून सुरू असलेल्या या अतिक्रमणांवर वेळीच चाप न बसवल्यास मुंबईप्रमाणे फेरीवाल्यांची ही समस्या हार्बर मार्गांवरदेखील उग्र रूप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पनवेल पालिका हद्दीत मोडणाऱ्या खारघर, मानसरोवर, खांदेश्वर; तसेच पनवेल रेल्वेस्थानकांचा विकास सिडको; तसेच रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
पालिका हद्दीत असूनसुद्धा रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या या रेल्वेस्थानकात; तसेच रेल्वेस्थानकाबाहेर होणाऱ्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर कारवाई करण्याचा अधिकार रेल्वे पोलिस; तसेच सिडकोच्या सुरक्षा रक्षकांवर आहे. उच्च न्यायालयाने रेल्वेस्थानकाच्या बाहेर; तसेच पादचारी पुलावर १५० मीटर अंतरापर्यंत व्यवसाय करण्यास निर्बंध लादले आहेत. असे असतानादेखील सिडको सुरक्षा मंडळ; तसेच रेल्वे पोलिसांकडून रेल्वेस्थानक परिसरात वावर असलेल्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने पालिका हद्दीत असूनदेखील पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकामार्फत कारवाई करणे शक्य होत नसल्याने अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांचे फावले असून, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरदेखील पालिका हद्दीतील रेल्वेस्थानक परिसरात बेकायदा फेरीवाले आपले बस्तान बसवून बसले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
स्टॉलचा अभाव
मध्य रेल्वेच्या मुंबई; तसेच उपनगरीय रेल्वेस्थानकावरील फलाटांवर रेल्वेमार्फत खाद्यपदार्थांचे स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हार्बर मार्गावर खारघरपासून पनवेल रेल्वेस्थानकावर अशा स्वरूपाचे स्टॉल उपलब्ध करण्यात आले नसल्याने फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ होत आहे.
रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर पालिकेने कारवाई करावी अशा स्वरूपाचे पत्र रेल्वे सुरक्षा बलाकडून प्राप्त झाले आहे; मात्र रेल्वेस्थानक परिसरातील कारवाई सुरक्षा बल आणि पालिकेच्या पथकाने सयुक्तिकरित्या करणे अपेक्षित आहे.
- जमीर लेंगरेकर, उपायुक्त, पालिका