शरद पवारांसोबत 51, तर अजित पवारांकडे फक्त 3 आमदार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 November 2019

शरद पवारांसोबत 51 आमदारांचे पाठबळ; अजित पवारांकडे केवळ तीन समर्थक आमदार 

मुंबई : विधिमंडळ पक्षनेतेपदाचा पुरेपूर वापर करत 54 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र भारतीय जनता पक्षाला देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंड मोडून काढण्याचे सर्वतोपरी प्रयत्न शरद पवार यांनी केल्याचे चित्र आहे. या 54 पैकी तब्बल 51 आमदारांनी आज शरद पवार यांच्यासमोर उपस्थित राहत अजित पवार यांच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाची हकालपट्‌टी करण्याचा ठराव संमत केला. यामुळे, अजित पवार यांचे बंड फसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

राष्ट्रवादीच्या केवळ तीन आमदारांना घेऊन भाजपचे विमान दिल्लीला गेले असून, इतर सर्व आमदारांना राष्ट्रवादीने एकत्र ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 
आज अकस्मात झालेल्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादीचे अकरा आमदार उपस्थित होते. मात्र, त्यापैकी नऊ आमदार परत शरद पवार यांच्याकडे आले असून, त्यांचा सर्वस्वी पाठिंबा शरद पवार घेतील त्या निर्णयाला राहील, अशी ग्वाही दिली. अजित पवार यांनी शपथविधीबाबत कोणतीही चर्चा केली नाही. फसवणूक करून शपथविधीला नेण्यात आल्याचे मत या आमदारांनी जाहीरपणे मांडले असल्याने अजित पवार यांच्या बंडाला शरद पवार लगाम लावणार यावर राष्ट्रवादीचे नेते ठाम आहेत. 

आज राष्ट्रवादीच्या बैठकीला स्वत: अजित पवार यांच्यासह दौलत दरोडा, भाईदास पाटील, बाबासाहेब पाटील व धर्मराव बाबा अत्राम उपस्थित नव्हते. यापैकी दौलत दरोडा शपथविधी सोहळ्यानंतर गायब झाले असून, ते हरवल्याची तक्रार त्यांच्या मुलाने पोलिसांत दाखल केली आहे; तर धर्मराव बाबा अत्राम गडचिरोलीहून निघाल्याने त्यांना पोचण्यास उशीर होत असल्याचे सांगण्यात आले. भाईदास पाटील व बाबासाहेब पाटील हे दोन आमदार मात्र अजित पवार यांच्या समर्थनार्थ कायम राहिल्याचा दावा करण्यात येत आहे.

Webtitle : fifty one mlas are with sharad pawar and three are with ajit pawar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fifty one mlas are with sharad pawar and three are with ajit pawar