COVID19 - मला खोकला येतोय, मी काय करू? 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 March 2020

महापालिकेच्या हेल्पलाईनवर नागरिकांची विचारणा 

नवी मुंबई : कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होत असल्याने थोडा खोकला वा सर्दी झाली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे एक-दोन दिवसांच्यावर खोकला राहिल्यास नागरिक पालिकेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधत आहेत. "खोकला झाला आहे काय करू?' अशी विचारणा करणारे दिवसभरात जवळपास 20 ते 25 दूरध्वनी येत असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास खोकला, ताप आणि सर्दी अशी लक्षणे आढळून येत आहेत. अशी एखादी संशयित व्यक्ती दिसल्यास किंवा अशी लक्षणे तुमच्यामध्ये आढळल्यास आरोग्य केंद्रात किंवा हेल्पलाईनवर संपर्क साधा, असे आवाहन पालिका प्रशासनामार्फत केले जात आहे. घाबरून जाऊ नका. योग्य काळजी घ्या, असे सांगितले जात असतानाही कोरोनाबाबत वारंवार व्हॉट्‌सअपवर येणारे संदेश, टीव्हीवरील बातम्या आदींमुळे नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच वातावरणात बदल झाल्याने खोकला-सर्दीचा त्रासही उद्‌भवू लागला आहे. त्यामुळे खोकला सतत राहून घसा खवखवू लागला वा तीन दिवसांच्या वर सर्दीचा त्रास कायम राहिला तरी नागरिक घाबरून पालिकेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधत आहेत.

मोठी बातमी - कोरोनामुळे मुंबईचा दूध पुरवठा होऊ शकतो बंद; जाणून घ्या कारण...

हेल्पलाईन केंद्रातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, जास्त दिवस खोकला किंवा सर्दी राहिली की असे कॉल येत आहेत. नागरिकांना घाबरून जाऊ नका, असे आवाहन आम्ही करत आहोत. जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन शंकेचे निरसन करून घ्या, असा सल्ला देत आहोत. त्याव्यतिरिक्त शेजारीपाजारी असे संशयित आढळल्यास किंवा कोणी व्यक्ती बाहेरून आली असल्यासही हेल्पलाईनवर कळवले जात आहे. 

मोठी बातमी -  आई बाबांच्या आधी 'त्या' अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीने हरवलं कोरोनाला... 

रात्र निवारा केंद्रातही गरजूंची सोय 
महापालिकेने बेलापूरमधील रात्र निवारा केंद्रातदेखील बेघर वा गरजूंसाठी नाश्‍ता, जेवण व आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, त्याविषयी जनमानसांत माहिती नसल्याने केंद्रात अद्याप कोणी गरजू आले नसल्याचे समाज विकास विभागाच्या उपायुक्त क्रांती पाटील यांनी सांगितले. केंद्रात जवळपास 75 जणांची सोय होऊ शकते. आरोग्यविषयक सुरक्षेबरोबरच आवश्‍यक सर्व सुविधा केंद्रात उपलब्ध असल्याने समाजसेवकांनी, संस्थांनी आणि नागरिकांनी गरजूंना त्याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.  

fight against corona navi mumbai municipal corporation helpline getting constant calls asking cold and cough

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fight against corona navi mumbai municipal corporation helpline getting constant calls asking cold and cough