युती होवो न होवो;प्रत्येक जागेसाठी लढा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 23 जुलै 2018

मुंबई - शिवसेनेबरोबर युती होवो अथवा राहो, आपल्यासाठी एक- एक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे आतापासून बूथप्रमुख ते कोअर कमिटी सदस्यांनी कामाला लागावे, असा सक्त आदेश भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे भाजप मंत्री, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना दिला.

मुंबई - शिवसेनेबरोबर युती होवो अथवा राहो, आपल्यासाठी एक- एक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे आतापासून बूथप्रमुख ते कोअर कमिटी सदस्यांनी कामाला लागावे, असा सक्त आदेश भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे भाजप मंत्री, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना दिला.

महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांतील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी शहा हे मुंबईत दाखल झाले आहेत. शहा यांनी दादर येथील पक्षाच्या ‘वसंत स्मृती’ या कार्यालयात बंददरवाजात पहिल्यांदा राज्यातील कोअर कमिटीची बैठक घेतली. नंतर या दोन राज्यांतील विस्तारक प्रमुखांची ही बैठक घेण्यात आली. प्रत्येक बैठकीत स्वतंत्रपणे वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा झाली. या चर्चेवेळी कोणत्याही परिस्थितीत लोकसभेच्या निवडणुका लागल्यानंतर भाजप ‘३५० प्लस’ जागांसाठी समर्थ असला पाहिजे, असा नारा देण्यात आला.

कोअर कमिटीच्या बैठकीला शहा यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, व्ही. सतीश, सरचिटणीस आमदार सुजीतसिंह ठाकूर, संघटनमंत्री विजय पुराणिक आदी उपस्थित होते. महाराष्ट्राप्रमाणेच गोवा राज्याच्यादेखील बैठका झाल्या. या बैठकीस गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते. त्यानंतर ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या भेटीसाठी शहा रवाना झाले.

लोकसभेच्या मतदारसंघांचा आढावा
या बैठकीत राज्यातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. तसेच, आगामी काळात मंत्री, प्रदेश पदाधिकारी आणि विस्तारक यांचा समन्वय वाढला पाहिजे, तळमेळ जमला पाहिजे, याकडे लक्ष देण्याची सूचना शहा यांनी केल्याचे सांगण्यात आले. यानंतर राज्य विस्तारक प्रमुख रामदास आंबटकर यांच्या सोबत शहा यांची बैठक झाली. या बैठकीला संघटनमंत्री म्हणून मंत्री जयकुमार रावळ, मंत्री संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते. या बैठकीत विस्तारक प्रमुख आंबटकर यांनी राज्यातील २५० विस्तारकांच्या कामांचा लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा आणि टीपण शहा यांना दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fight for every seat says amit shah