
राजीनामा देऊन निवडणूक लढवा
मुंबई - ज्यांनी बंडखोरी केली आहे, जे विकले गेलेले आहेत. त्यांनी राजीनामे द्यावेत आणि पुन्हा निवडणूक लढवावी. त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही असे खुले आव्हान शिवसेनेचे युवानेते व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडाळी केलेल्या शिवसेनेच्या आमदारांना दिले. तसेच मुंबईतून काही आमदारांना जबरदस्तीने गुवाहाटीला नेले आहे. पण ह्रदयाने-मनाने ते आपल्यात आहेत. त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे खुले आहेत. पंधरा बंडखोर आमदार संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज केला.
शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मेळावे घेण्याचा सपाटा लावला आहे. आज शिवसेनेमध्ये युवासेनेचा मेळावाही आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे यांनी सुरुवातीलाच पर्यटनमंत्री असल्याने महाराष्ट्रात घाण होणार नाही याची मला काळजी घ्यावी लागते. त्यामुळे घाण गेली असल्याचा टोला त्यांनी शिवसेनेच्या फुटीर आमदारांना लावला.
तसेच यावेळी त्यांनी महिनाभरापूर्वी २० मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री एकनाथ शिंदेंना तुला मुख्यमंत्री बनायचे असेल तर तुला मुख्यमंत्री करतो. पण हे सगळे जे सुरू आहे ते थांबव... असं सांगितले होतं. पण त्यावेळी रडारड केली आणि असं काही नसल्याचे म्हणाले. पण त्यानंतर बरोबर एक महिन्यानेच त्यांनी हे कारस्थान केले असल्याचे सांगत संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतल्याची खंत आदित्य यांनी ‘हम शरीफ क्या हुये, पुरी दुनिया ही बदमाश हुयी’ या शेरमधून व्यक्त केली.
शिवसेनेत मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार व इतर मंत्र्यांनी बंड केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांप्रमाणे आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवेसेना पदाधिकाऱ्यांशी संपर्क वाढवित ते सक्रिय झाले आहेत.
नजरेला नजर कशी भिडवतील?
यावेळी आदित्य यांच्या भाषणातून एकनाथ शिंदे यांच्याविषयी त्यांचे नाव न घेता चीड व्यक्त केली. निवडणुकीत उमेदवारी देण्यापासून मंत्रिपद देण्यापासून यांचे सर्व प्रकारचे चोचले, नाराजी सहन केली. पण त्यांचा कायम सन्मान केला असल्याचे ते म्हणाले. हे सर्व बंडखोर आमदार संरक्षणात सभागृहात पोहोचतील, पण सभागृहात नजरेला नजर कसे भिडवतील, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.
Web Title: Fight The Election By Resigning Aditya Thackeray
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..