आईचा मृतदेह शोधून द्या; अश्‍विनी बिद्रे यांच्या मुलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याने माझ्या आईची हत्या करून तिचा मृतदेह वसईच्या खाडीत टाकून दिला असून माझ्या आईचा मृतदेह मला शोधून द्या, अशी भावनिक मागणी मृत अश्विनी बिद्रे यांची मुलगी सुची गोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. 

नवी मुंबई : पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याने माझ्या आईची हत्या करून तिचा मृतदेह वसईच्या खाडीत टाकून दिला असून माझ्या आईचा मृतदेह मला शोधून द्या, अशी भावनिक मागणी मृत अश्विनी बिद्रे यांची मुलगी सुची गोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. 

मी सहा वर्षांची असताना माझी आई सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे हिचा पोलिसाने खून केला आणि तिचा मृतदेह वसई खाडीत फेकून दिला. पैसे नाहीत असे कारण पुढे करून माझ्या आईच्या मृतदेहाचा शोध घेण्याचे काम थांबविण्यात आले आहे. त्यामुळे माझ्या आईचा मृतदेह मला शोधून द्या, अशी मागणी सुची गोरे हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

ही बातमी वाचा : सावधान..मुंबईत एस्काॅर्टच्या नावाने फोफावतोय व्यश्याव्यवसाय 
हातकणंगले येथील एका शाळेत सुची सध्या इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत आहे. तिने आठवडाभरापूर्वी मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र लिहून आपल्याला भेट मिळावी, अशी विनंती केली आहे. या पत्रात तिने यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांना आपले बाबा भेटण्यासाठी गेले होते, त्यावेळेस मीही त्यांच्यासोबत होते. सकाळपासून ते रात्रीपर्यंत आम्ही त्यांच्या दालनात ताटकळत थांबलो होतो. मात्र ते आम्हाला भेटले नाहीत. त्यामुळे आपण मला व माझ्या बाबांना भेट द्यावी, अशा विनंतीचे व भावनिक साद घालणारे पत्र सुची गोरे हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. 

...तर बाबा पूर्ण वेळ माझ्यासोबत राहतील 
मी बालपणातच आई गमवली आहे, आता मला बाबांना गमवायचे नाही. आईप्रमाणेच पोलिस माझ्या बाबांना मारतील का? अशी भीती मला नेहमी वाटते. माझ्या आईच्या खुन्यांना शिक्षा मिळवून देण्यासाठी माझे बाबा नेहमीच मुंबई, नवी मुंबईला न्यायालयात येत-जात असतात. अनेक वेळा मीही त्यांच्याबरोबर असते. माझे बाबा सध्या कोर्टात हरवले आहेत. जर माझ्या आईच्या खुन्यांना लवकर शिक्षा झाली तर ते कोर्टाऐवजी पूर्णवेळ माझ्यासोबत राहतील. आयुष्यात आईची जी उणीव निर्माण झाली आहे, ती कमी होईल, असेही सुचीने आपल्या पत्रात नमूद केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Find the mother's body; Letter to Chief Minister of Ashwini Bidre's daughter