दंड केला, रिक्षा जप्त केल्या; पण रिक्षाचालकांना शिस्त लागेना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

कारवाईने स्टेशन परिसर मोकळा झाला होता. मात्र काही वेळानंतर पुन्हा रिक्षाचालकांनी नियम मोडत परिसरात गर्दी केल्याने आणखी कठोर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे. 

कल्याण : कल्याण रेल्वेस्थानक परिसरातील बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई केल्याने रिक्षाचालकांचे धाबे दणाणले. यावेळी एक हजारहून अधिक रिक्षांची तपासणी करताना शेकडो रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करत 46 रिक्षा जप्त करण्यात आल्या. या कारवाईने स्टेशन परिसर मोकळा झाला होता. मात्र काही वेळानंतर पुन्हा रिक्षाचालकांनी नियम मोडत परिसरात गर्दी केल्याने आणखी कठोर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे. 

ही बातमी वाचा ः लोकलमध्ये दिव्यांगांच्या डब्यामध्ये घुसखोरांची वाढ
कल्याण आरटीओ आणि कल्याण वाहतूक पोलिस यांच्यामार्फत रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृती मोहीम सुरू आहे. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत, यामुळे अपघात टाळता येणे शक्‍य आहे. यासाठी शाळा, महाविद्यालय आणि मोटार वाहन प्रशिक्षण केंद्रामध्ये विविध कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. असे असतानाही रिक्षाचालकांचा मनमानी कारभार सुरूच राहिल्याच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात येत होत्या. याची दखल घेत कल्याण वाहतूक पोलिस विभागाने मंगळवारी सकाळी 9 वाजल्यापासून कल्याण स्टेशन परिसरातील एक हजारहून अधिक रिक्षांची तपासणी केली. 
यावेळी अनेक रिक्षा संघटना नेत्यांनी स्टेशन परिसरातून काढता पाय घेतला. कारवाईमुळे काही तास परिसर मोकळा झाल्याने नागरिकांनी मोकळा श्‍वास घेतला. या बेशिस्त रिक्षाचालकांमुळे दीपक हॉटेल, महात्मा फुले चौक, गुरुदेव हॉटेल आणि वली पीर रोड परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अशा प्रकारची कारवाई सातत्याने करावी, अशी मागणी कल्याणकर करत आहेत. 

कागदपत्रेच नाहीत 
यावेळी अनेकांकडे परवाना, गणवेश, बॅच, परमिट यासह अनेक कागदपत्रे आढळली नाहीत. त्यामुळे शेकडो रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करत 46 रिक्षा जप्त करण्यात आल्या. या कारवाईने बेशिस्त रिक्षाचालकांचे चांगलेच धाबे दणाणले. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची कारवाई पाहून बेशिस्त रिक्षाचालकांनी गुरुदेव हॉटेल, वलीपीर रोड आणि महात्मा फुले चौक येथे प्रवाशांना उतरवून काढता पाय घेतला. यामुळे प्रवाशांना पायी चालत रेल्वेस्थानक गाठावे लागले. 

रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृतीसोबत बेशिस्त वाहनचालकांविरोधात कारवाई करण्यात आली. यावेळी एक हजारहून अधिक रिक्षांची तपासणी करत शेकडो रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 
- सुखदेव पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कल्याण वाहतूक शाखा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fined, seized rickshaw; But the rickshaw driver did not have the discipline