ज्येष्ठ खातेदारांच्या घरापर्यंत पोहचली फिनो पेमेंट बँक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 April 2020

लॉकडाऊनच्या काळात संचारावर निर्बंध असताना फिनो पेमेंट बँक खातेदारांच्या घरी पोहचली आहे. आपल्या घरीही बँकेचे व्यवहार करणे त्यामुळे खातेदारांना शक्य झाले आहे 

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात संचारावर निर्बंध असताना फिनो पेमेंट बँकेचा पर्याय विशेषतः ज्येष्ठ नागरिक, गर्भवती, अपंग आदींसाठी तसेच सामान्य नागरिकांसाठीही वरदान ठरला आहे. आपल्या इमारतीत अगदी आपल्या घरीही बँकेचे व्यवहार करणे त्यामुळे खातेदारांना शक्य झाले आहे. 

महत्त्वाचं : मुंबईत बांधकामांना परवानही, मात्र अट एकच

संचारबंदीमुळे बँकेत जाणेही अवघड झाले आहे. बँकेतील गर्दीमुळे पुन्हा संसर्गाचा धोका वाढतो, अशा स्थितीत फिनो पेमेंट बँकेने सोसायट्यांच्या आवारात आपली किओस्क सेंटर उभारून बँकिंग व्यवहार केले. त्यामुळे खातेदारांना चांगलाच दिलासा मिळाला. अनेक ठिकाणी दोन तासांमध्ये लाखो रुपयांचे पैसे काढण्याचे व जमा करण्याचे व्यवहार करण्यात आले. सोसायट्यांनी या बँकेच्या कर्मचाऱ्यांना प्रवेश दिल्यावर तेथे सुरक्षित अंतर राखून सर्व व्यवहार करण्यात आले. अपंग, गर्भवती आणि विधवा महिलांना तेथेच सरकारी योजनांचे लाभ देण्यात आले तर ज्येष्ठ नागरिकांना घरी जाऊन निवृत्तीवेतनाचे वाटप करण्यात आले. 

हेही वाचा : चिथावणीखोर भाषण करणारा एजाज अखेर तुरुंगात

किओस्क सेंटरमधील मायक्रो एटीएम सेंटरमार्फत पैसे काढताही येतात. तेथे कोणत्याही बँकेचे कार्ड स्वाईप होते. या बँकेने किराणा दुकानांमध्येदेखील ही सेवा सुरू केली आहे. त्यामुळे लोकांना फार लांब न जाता दुकानांमधून बँकेचे व्यवहार करता येतात. मात्र आता लॉकडाऊनच्या निमित्ताने घरापर्यंत बँक आणण्याचे उद्दिष्ट  फिनो बँकेने पूर्ण केले. 

अपंग, ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान
सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात लोकांना काम नसल्याने पैसेही संपत आले आहेत. अनेक जण तर सरकारच्या जनधन योजनेच्या किंवा निवृत्तीवेतनाच्या पैशांवरच दिवस काढत आहेत. मात्र अपंग, ज्येष्ठ नागरिक आदींना ते पैसेही काढता येत नाहीत. अशा स्थितीत फिनो बँक त्यांना वरदान ठरली आहे, असे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक ऋषी गुप्ता यांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fino bank has reached account holder's home during a lockdown, for Payments