Fire Accident: मुंबईतील साकीनाका भागात अग्नितांडव! दोघांचा होरपळून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fire Accident

Fire Accident: मुंबईतील साकीनाका भागात अग्नितांडव! दोघांचा होरपळून मृत्यू

मुंबईत पहाटे साकीनाका परिसरात मोठी आग लागली. या आगीत हार्डवेअरचं संपूर्ण दुकान जळून खाक झालं.अचनाक लागलेल्या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. शर्थीच्या प्रयत्नानंतर केवळ अर्ध्या तासातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं होतं, मात्र 5 वाजता पुन्हा आग वाढली.

साकीनाका परिसरातील एका हार्डवेअर दुकानाला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून, त्यात दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांनी दिली. आगीचे स्पष्ट कारण अद्याप कळू शकले नाही असे ते म्हणाले. राकेश गुप्ता आणि रमेश देवसिया अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान साकीनाका या भागात गेल्या काही वर्षांत अशा आगीच्या अनेक घटना घडत आहेत.

गेल्या वर्षीही येथील खैरानी रोड तसेच आणखी इतर ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. साकीनाका भागातील मेट्रो रेल्वेलगत असलेल्या पेनेंसुला ग्रँड हॉटेल समोर राजश्री हार्डवेअरला आग लागली. या आगीच्या झळा बाजूला असलेल्या एका गोदामालाही लागल्या. या ठिकाणी दुमजली दुकाने देखील होती. ही आग मध्य रात्री तीनच्या सुमारास लागली असल्याचे सांगण्यात येत असून, त्यानंतर अग्निशमन दलाच्या 8 गाड्या त्या ठिकाणी दाखल झाल्या.

अचनाक लागलेल्या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण पसरले होते. या दुकान आणि गोडाऊन मध्ये 10 ते 12 कामगार होते. ते तेथेच राहत होते. ही आग लागली त्यावेळीही ते सर्वजण या ठिकाणी झोपले होते. मात्र त्यानंतर आग लागताच त्यांना जाग आली. त्यामुळे ते सर्वजण जीव वाचवण्यासाठी पळू लागले.

मात्र त्यात मृत झालेले दोघेजण सापडले. त्यात राकेश गुप्ता याला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेतानाच त्याचा प्राण गेला असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यांच्या अथक प्रयत्नानंतर केवळ अर्ध्या तासातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र पुन्हा 5 वाजता ही आग भडकली. त्यामुळे पुन्हा आणखी अग्निशमन दलाच्या काही गाड्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या आगीमुळे संपूर्ण साकीनाका परिसरात मोठ्या प्रमाणात धूराचे लोळ पसरले होते. आग कशामुळे लागली, याबाबत अधिक तपास स्थानिक साकीनाका पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.

या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून,आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दलाचा अहवाल आल्यानंतरच आगीचे नक्की कारण कळेल. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून, इतर कोणी जखमी झाले नाही. एक दुकान जळून खाक होऊन नुकसान झाले आहे असे साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांनी माहिती देताना सांगितले.

टॅग्स :fireMumbaiFire Accident