esakal | मुंबई-अहमदाबाद मार्गावर अग्निशमन यंत्रणाच नाही
sakal

बोलून बातमी शोधा

अग्निशमन यंत्रणा,

मुंबई-अहमदाबाद मार्गावर अग्निशमन यंत्रणाच नाही

sakal_logo
By
नविद शेख

मनोर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघात आणि अन्य कारणांमुळे वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांत वाढ झाली आहे. या महामार्गावर ज्वलनशील वायू, द्रव्य आणि पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे महामार्गावर अग्निशमन यंत्रणा गरजेची आहे. मात्र, याकडे महामार्गावर टोल वसूल करणारी कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.

वर्सोवा पूल ते गुजरात राज्याच्या सीमेवरील आच्छाडपर्यंत सुमारे ११० किलोमीटर लांबीचा महामार्ग पालघर जिल्ह्याच्या हद्दीतून जातो. दिल्ली, राजस्थान आणि गुजरात राज्यातील मालवाहतूक करणारी वाहने या महामार्गाचा वापर करतात. ३१ जानेवारी २०१९ पासून या महामार्गावर अपघातात आग लागण्याच्या ९ ते १० घटना घडल्या. यात ४ जणांचा मृत्यू झाला; तर वाहनांचेही नुकसान झाले.

हेही वाचा: मंत्री रावलांकडून नौकानयनपटू मनीषा माळीला एक लाखाची मदत

अपघातात एखादी आगीची घटना घडल्यावर अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नसल्याने इतर ठिकाणी उपलब्ध असलेले अग्निशमन दलाचे बंब पाचारण करावे लागतात. आगीच्या घटनांमध्ये अडकलेले वाहनचालक आणि प्रवाशांच्या जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणारे महामार्ग पोलिसही यात हतबल होतात. त्यामुळे आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महामार्गावर क्रेन, रुग्णवाहिका आणि अग्निशमन यंत्रणा उभारण्याची मागणी वाहनचालक आणि प्रवाशांकडून केली जात आहे. दरम्यान, सुरक्षेवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि आयआरबी कंपनीकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते हरबन्स नन्नाडे यांनी केला आहे.

हेही वाचा: अंबरनाथला : गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा

यापूर्वीच्या आगीच्या घटना

  • १३ ऑगस्ट २०२१ कुडे गावच्या हद्दीत कारला शॉर्टसर्किटमुळे आग

  • ३१ जुलै २०२१ साये गावच्या हद्दीत शॉर्टसर्किटमुळे इनोव्हा कार जळून खाक

  • २८ मे २०२१ खानीवडे टोल नाक्याजवळ ट्रकला शॉर्टसर्किटमुळे आग

  • १३ ऑगस्ट २०२० - ढेकाळे उड्डाणपुलावर इको कार आणि बस अपघातात कारने पेट घेतला. यात कारचालकासह एक प्रवाशाचा मृत्यू

  • ३१ जानेवारी २०१९ - आवंढाणी गावच्या हद्दीत ज्वलनशील गॅस सिलिंडर भरलेला ट्रक उलटून ट्रकला आग. आगीत ट्रक चालक आणि वाहकाचा होरपळून मृत्यू

वाहने उपलब्‌ध करून देण्याचे निर्देश

पोलिसांकडून महामार्गावर अग्निशमन यंत्रणा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यावर सुरक्षा आढावा बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातून महामार्गावर अग्निशमन दलाची किमान दोन वाहने उपलब्ध करून देण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आले आहेत.

सुरत-दहिसर टोल वे प्रोजेक्टच्या करारात अग्निशमन यंत्रणा उभारण्याबाबत उल्लेख नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अग्निशमन यंत्रणा उभारण्याबाबत निर्णय घेण्याची गरज आहे.

- श्रीनिवास राव, मुख्य जनसंपर्क अधिकारी, आयडियल रोड बिल्डर.

loading image
go to top