
सोमेय्या मेडिकल काॅलेजमध्ये पहिल्यांदाच काॅक्लिअर इम्प्लांटची यशस्वी शस्त्रक्रिया
मुंबई : मुंबईतील गोवंडी परिसरात राहणाऱ्या तीन वर्षाच्या मुलीवर यशस्वीरित्या काॅक्लिअर इम्प्लांट करण्यात आले आहे. के जे सोमैया रुग्णालय अॅण्ड रिसर्च सेंटरच्या ईएनटी विभागाने पहिल्यांदाच काॅक्लिअर इम्प्लांटच्या मोफत शस्त्रक्रियेनंतर एका छोट्या मुलीला ऐकू येण्यास शक्य होणार आहे.
या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर ही मुलगी आता सर्व सामान्य आयुष्य जगू लागेल अशी आशा सोमैय्या रुग्णालयातर्फे व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान मूक बधिर मुलांवर लवकरात लवकर कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया केल्यास चांगला प्रतिसाद मिळून मुल लवकर बोलू किंवा ऐकू शकते. मात्र भारतात याबाबत अद्याप जनजागृती नसल्याने या शस्त्रक्रियेचे प्रमाण कमी आहे. कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक डॉ. दिनेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली. तर कॉक्लिअर शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. मिनेश जुवेकर यांनी शस्त्रक्रिया केली.
यावर बोलताना डॉ. जुवेकर यांनी सांगितले की, कॉक्लिअर इम्प्लांट प्रोग्रामशी आम्ही जोडले गेले आहोत. या शस्त्रकियेसाठी किमान दहा ते बारा लाख खर्च येतो. पण, आम्ही ही शस्त्रक्रिया मोफत केली. १ ते ४ वर्षाच्या मुक बधीर असलेल्या मुलांच्या तपासणी करण्यासाठी आम्ही शाळा आणि तज्ज्ञांच्या माध्यमातून शिबिरे भरवत असतो. यातून जागरुकता होते. शिवाय ते उपचाराकडे वळावेत असे या शिबिरांचा हेतू असतो. कारण या कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरीमुळे मुलांतील अपंगत्व काढून टाकण्यास मदत होते. यातून हे मुल सर्वसाधारण मुलाप्रमाणे खेळू शकते, शिकू शकते, कामधंदा करु शकते. यातून ताण कमी होत असल्याचे डॉ. जुवेकर म्हणाले.
तर डॉ. वैद्य यांनी सांगितले की,
शस्त्रक्रिया करुन जे उपकरण बसवण्यात आले आहे ते १५ दिवसांनी स्वीच ऑन म्हणजे सुरु करण्यात येईल. हे सुरु केल्यानंतर साधारणपणे दोन महिन्याच्या कालावधीत उपकरणाचा फायदा ध्यानात येऊ लागेल. हे उपकरण सुरु केल्यानंतर ते ऐकायला लागतात. त्यांची बोलण्यात सुधारणा होऊ लागते. हे उपकरण जेवढ्या लवकर बसवण्यात येईल तेवढा चांगला प्रतिसाद मिळू लागतो. त्यामुळेच १ ते चार वर्षाच्या कालावधीत कॉक्लिअर एम्प्लांट करावे असे डॉ. वैद्य म्हणाले.