देशातील पहिले कमांड ऍण्ड कंट्रोल सेंटर ठाण्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

स्मार्ट सिटी अंतर्गत ठाणे महानगरपालिकेचा उपक्रम

ठाणे : महापालिकांच्या नागरी सुविधांचे सुसूत्रीकरण आणि दैनंदिन कामकाजाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या स्मार्ट सिटी अंतर्गत ठाणे महानगरपालिकेने हाजुरी येथे उभारलेल्या कमांड ऍण्ड कंट्रोल सेंटरला शनिवारी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी भेट दिली. अशा पद्धतीचे महापालिकेने उभारलेले हे देशातील पहिले कमांड ऍण्ड कंट्रोल सेंटर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - खोट्या नोटा शोधण्याच्या बहाण्याने खातेदाराला गंडा

महापालिकेच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या सर्व नागरी सुविधांचे सुसूत्रीकरण व्हावे, तसेच पालिकेचे दैनंदिन कामकाज प्रभावीपणे करता यावे, यासाठी महापालिकेने या कमांड ऍण्ड कंट्रोल सेंटरची निर्मिती केली आहे. या कमांड ऍण्ड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून महापालिकेच्या जवळपास 50 पेक्षा जास्त सुविधांचे सुसूत्रीकरण करण्यात येणार आहे. सदरचे कमांड ऍण्ड कंट्रोल सेंटर महापालिकेच्या सर्व विभागांशी जोडण्यात येणार असून यामध्ये घनकचरा व्यवस्थापन विभाग, डीजी ठाणे, पाणी पुरवठा, विद्युत विभाग, ई-गव्हर्नन्स, शिक्षण, परिवहन यासह जवळपास सर्व विभागांचा समावेश आहे. या सर्व विभागांचे स्वतंत्र कमांड ऍण्ड कंट्रोल सेंटर असणार असून त्या सर्व कमांड ऍण्ड कंट्रोल सेंटरला हे मुख्य कमांड ऍण्ड कंट्रोल सेंटरशी जोडण्यात येणार आहे. जेणेकरून या सर्व विभागांची माहिती आवश्‍यक त्यावेळी उपलब्ध करून घेता येऊ शकेल. 

हेही वाचा - पोलिसांना बिर्याणी पडली महाग

यासाठी शहरात जवळपास बाराशे कॅमेरे बसविण्यात आले असून ते सर्व कॅमेरे या मुख्य सेंटरला जोडण्यात आले आहेत. या सेंटरच्या मुख्य डिस्प्लेला शहराचा नकाशा संलग्न केला असून या संलग्न केलेल्या नकाशावरील ठिकाण निश्‍चित केल्यास तिथे असलेल्या कॅमेऱ्याने टिपलेल्या व्हिडीओचे पृथकरण करण्याची यंत्रणा यामध्ये आहे. सदरचा डेटा हा आवश्‍यकतेनुसार पोलिसांना तपासकामी उपयुक्त ठरणार आहे. 

शहारात चार हजार सेन्सर्स 

शहरात एखाद्या ठिकाणी कचरा उचलला नसेल तर त्याची माहिती संबंधित विभागाला तातडीने देण्याची सुविधा या कमांड ऍण्ड कंट्रोल सेंटरमध्ये करण्यात आली असून त्यासाठी शहरात जवळपास चार हजार सेन्सर्स बसविण्यात येणार आहेत. हे सेन्सर्स पाईपलाईन फुटल्यास, अपघात घडल्यास, कचरा साठल्यास, चेंबर कव्हर्स तुटल्यास, बस बंद पडल्यास कमांड ऍण्ड कंट्रोल सेंटरमध्ये अलार्म वाजवून त्याची सूचना देतील. ही माहिती प्राप्त होताच त्याची सूचना संबंधित विभागाला देण्यात येईल, अशी माहिती आयुक्त जयस्वाल यांनी दिली. 
 

web title : First Command & Control Center in the country

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First Command & Control Center in the country