सुके मासे, आता खाणार कसे?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 मार्च 2020

समाजमाध्यमांवर कोरोना आणि चिकनचा संबंध असल्याचे संदेश पसरले आहेत. त्यामुळे खवय्यांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. या परिस्थितीत मांसाहारीसमोर मटण, ताजे मासे आणि सुक्‍या मासळीचा पर्याय आहे. मटण महाग असल्याने आणि ताजे मासे मिळत नसल्याने त्यांनी अखेर सुक्‍या मासळीला पसंती दिली आहे.

रोहा : कोरोनाच्या धास्तीने रायगड जिल्ह्यात चिकनची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. दुसरीकडे समुद्रात मासेही कमी प्रमाणात मिळत आहेत. त्यामुळे मासेप्रेमींनी सुक्‍या मासळीला अधिक पसंती दिली आहे. त्याचा परिणाम किमतींवर झाला असून 15 दिवसांत या मासळीची 25 ते 30 टक्के भाववाढ झाली आहे. कोळंबीचे सोडे तब्बल 2 हजार 700 रुपये प्रति किलोने विकण्यात येत आहेत; तर कोळंबी सुकट 300 रुपयांनी महाग झाली आहे. 

धक्कादायक : काकून बदक, गुलाबी मैना गावावर राहिली

समाजमाध्यमांवर कोरोना आणि चिकनचा संबंध असल्याचे संदेश पसरले आहेत. त्यामुळे खवय्यांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. या परिस्थितीत मांसाहारीसमोर मटण, ताजे मासे आणि सुक्‍या मासळीचा पर्याय आहे. मटण महाग असल्याने आणि ताजे मासे मिळत नसल्याने त्यांनी अखेर सुक्‍या मासळीला पसंती दिली आहे. परंतु सुक्‍या मासळीची मागणी वाढल्याने त्याचे भावही 25 ते 30 टक्के वाढले आहेत. 
पंधरवड्यापूर्वी वाखटी, बोंबील 400 रुपये प्रति किलोने विकले जाते होते. ते आज 600 रुपये प्रति किलो आहेत. मुशी, ढोमी यांचा भाव 200 होता. तो आता आज 300 रुपये आहे. कोळंबी सुकट 300 रुपये प्रति किलो होती. ती 600 रुपये प्रति किलोने आहे. 

जवळा स्वस्त 
सुक्‍या मासळीतील वाखटीपासून बोंबील, ढोमी आदींचे भाव गगनाला भिडले असताना जवळा स्वस्त झाला आहे. त्याचा भाव 300 ते 350 रुपये किलो होता. तो 200 रुपये किलोने आहे. मासेमारी करताना जवळा मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने दर उतरल्याचे मच्छीमार सांगतात. तसेच सुक्‍या मासळीचे भाव वाढले असले तरी विक्री चांगली होत असल्याचे विक्रेते सांगतात. 

बाजारात सुक्‍या मासळीची मागणी वाढली आहे. त्यामुळे 25 ते 30 टक्‍क्‍यांनी भाववाढ झाली आहे. 
- सुनीता पुजारी, सुकी मासळी विक्रेती, रोहा 

समुद्रात मासळी मिळत नसल्याने तुटवडा आहे. सुक्‍या मासळीची आवक खूप घटली आहे. त्यामुळे भाव वाढले आहेत. 
- मुक्ता गुणाजी, घाऊक विक्रेत्या, दिघी 

सुक्‍या मासळीचे दर / प्रति किलो ( रुपयांत) 

मासळी 20 फेब्रुवारी 5 मार्च 

 कोळंबी सोडे 2000 2700 
 कोळंबी सुकट 300 600 
 बोंबील 400 600 
 वाखटी 400 600 
 मुशी 200 300 
 मांदेली 200 300 
 ढोमी 200 300 
 भेल। सुकट 200 240 
 लेपा 200 240 
 टेंडली सुकट 300 400 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fish expensive in Raigad district