चर्चा तर होणारच ! पालघरच्या समुद्रात मासेमाऱ्यांना आढळला उडणारा दुर्मिळ मासा

चर्चा तर होणारच ! पालघरच्या समुद्रात मासेमाऱ्यांना आढळला उडणारा दुर्मिळ मासा

पालघर : पालघरच्या समुद्रकिनाऱ्यावर मासेमाऱ्यांना एका अनोख्या प्रजातीचा मासा आढळून आलाय. पालघरमधील मासेमार मासेमारीसाठी समुद्रात गेले असता त्यांच्या जाळ्यात हा अनोखा मासा आढळून आलाय. या माशाची खासियत म्हणजे हा मासा पाण्यात तर पोहतोच मात्र हा मासा पाण्याबाहेर उडतो देखील. पालघरच्या समुद्रात हा उडणारा मासा प्रथमच आढळून आल्याने आता या माशाबाबत नागरिकांमध्ये कुतूहल आणि कमालीची चर्चा आहे. सदर मासा हा 'फ्लाईंग फिश' जातीचा आहे.  

जगभर 9 प्रजाती आणि 64 जाती

पालघरमध्ये आढळून आलेल्या 'फ्लाईंग फिश' माशाच्या जगभर 9 प्रजाती आणि 64 जाती असून उष्ण प्रदेशातील समुद्रात हा मासा आढळून येतो. त्यांचे वक्षपर विस्तीर्ण व पडद्यांनी बनलेले असून ते पंखांप्रमाणे काम करतात. या माशाला पाखरू मासा असं म्हंटल जातं. पाखरू मासे त्यांच्या बळकट शेपटीला रेटा देऊन पाण्याच्या पृष्ठभागावर उसळी मारून बाहेर झेप घेतात आणि परांच्या साहाय्याने काही अंतर हवेत तरंगत अंतर पार करतात. त्यांच्या या वैशिष्ट्यांमुळे त्यांना पाखरू मासा असे देखील म्हटले जाते. मात्र ते पक्ष्यांप्रमाणे उडू शकत नाहीत. मात्र ते जेंव्हा तरंगत पुढे जातात तेंव्हा हे मासे उडतायत की काय असा भास होतो.  

माशाचे शास्त्रीय नाव 'एक्झॉसीटस व्होलिटॅन्स'

कोकण किनारपट्टीवर आढळणाऱ्या पाखरू माशाचे शास्त्रीय नाव 'एक्झॉसीटस व्होलिटॅन्स' असे आहे. एक्झॉसीटिडी कुळातील माशांचे शरीर १५–४५ सेंमी लांब व दोन्ही टोकांना निमुळते असते. त्यांचे पृष्ठपर आणि गुदपर शेपटीच्या अगदी जवळ असतात. वक्षपर विस्तृत व पातळ पडद्यांचे बनलेले असतात. काळपट रंगाच्या या वक्षपरांवर काही जातींमध्ये ठळक काळे ठिपके असतात. शरीरावर मध्यम आकाराचे चमकते चंदेरी खवले असतात. या माशाचं तोंड वर वळलेले असते, त्याचे डोळे मोठे असतात आणि वाताशय मोठा असतो. अटलांटिक, प्रशांत आणि हिंदी महासागरात हे मासे प्रामुख्याने आढळतात. खोल समुद्रात हे मासे आढळत असून किना-यावर ते क्वचितच पाहायला मिळतात.

तासाला ७० किमी.वेगाने उडू शकतात​

शत्रूपासून बचाव करताना किंवा भक्ष्याचा पाठलाग करताना पाखरू मासे पाण्याबाहेर येऊन तरंगतात. पाण्याबाहेर येण्यापूर्वी ते पोहण्याचा वेग अतिशय वाढवतात आणि उसळी घेऊन शरीर पाण्याबाहेर काढतात व वक्षपर पसरतात. ते पुच्छपराने दोन्ही बाजूंच्या पाण्याला फटकारे देत नागमोडी मार्गाने पुढे सरकतात आणि शेपटीला रेटा देऊन हवेत पूर्णपणे झेपावतात. ते पाण्यातून उसळी घेण्यापूर्वी शरीर काही सेकंद हलवून गती प्राप्त करतात.हे मासे तासाला ७० किमी.वेगाने उडू शकतात आणि पाण्याच्या पृष्ठभागापासून सुमारे ६ मी. उंच तरंगू शकतात. पाण्यात परत शिरताना वक्षपर मिटले जातात किंवा शेपटीने पाण्यावर झटका देत पुन्हा तरंगण्यासाठी गती प्राप्त करतात. 

fish from exocoetidae family, fishermen of palghar, flying fish 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com