
विरार : पावसाळा मासेमारी बंदी असतानाही धोका पत्करून खवळलेल्या समुद्रात मासेमारीकरिता गेलेल्या मच्छिमारांच्या मृत्यूला मत्स्यखात्याचे भ्रष्ट अधिकारी जबाबदार आहेत. याप्रकरणी स्थानिक परवाना अधिकार्यापासून जिल्ह्याचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त, आयुक्त कार्यालयातील मत्स्य उपायुक्त तथा मत्स्य आयुक्त या सर्वांविरोधात कायदेशीर निर्देशांची अवज्ञा करणे यासह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून या सर्वांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश फिशरमन काँग्रेसचे मुख्य समन्वयक मिल्टन सौदिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याचसोबत मासेमारी बंदीचे उल्लंघन करून मासेमारीकरिता जाणार्या बोटी ज्या संस्थेच्या आहेत, त्यांच्यावरही कारवाई करून या बोटींना बेकायदा मासेमारी करण्याकरिता कोणी डिझेल पुरवले, याचाही शोध घेण्याचे सौदिया यांचे म्हणणे आहे.