
अंधेरी :- घोरफोडीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या सराईत चोरट्यांना कोरोनाच्या कारणास्तव ऑर्थररोड कारागृहातून पेरॉलवर सोडून देण्यात आले होते. मात्र, बाहेर आल्यानंतरही गुन्हेगारांनी पुन्हा घरफोडी करून हैदोस घातला. त्यामुळे कुरार व्हिलेज पोलिसांनी हैदोस घालणाऱ्या या पाच सराईत गुन्हेगारांना पुन्हा बेड्या ठोकल्या आहेत. मोहसीन मोहम्मद हनिफ शेख, प्रदीप यादव, कृष्णा राणा, शुभम बामणे आणि गणेश काऊंडर अशी आरोपींची नावे आहेत.
... हे तर गलिच्छ राजकारण; अदित्य ठाकरेंनी विरोधकांना कडक शब्दांत सुनावलं...
29 जुलै रोजी कुरार पोलिसांचे विशेष पथक गस्तीवर असताना त्यांनी चोरीच्या बाईकसह दोघांना अटक केली. त्यांच्या अधिक चौकशीत दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले. झोपडपट्टी परिसरातून कोरोना काळात बहुतांश परप्रांतीय आपापल्या मूळ गावी निघून गेले होते. त्यांच्या बंद घरांची रेकी करून ही पाचजनांची टोळी घरफोडी करीत होती. आरोपींच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने आणखी तिघांना अटक केली. त्यांच्या चौकशीत त्यांनी 9 गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरी केलेल्या एक लॅपटॉप, चार मोबाईल, एक बाईक आणि सोन्याचे दागिने असा साडेपाच लाखांचा मुद्देमालही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
आरोपी मोहसीन विरुद्ध आंबोली, कुरार पोलीस ठाण्यात 7 गुन्ह्याची नोंद आहे. कृष्णा राणा याच्या विरोधात आंबोली पोलीस ठाण्यात आणि वर्सोवा पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. तर, शुभम याच्या विरोधात आंबोली पोलीस ठाण्यात चार गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांनी दिली.
कोरोनामुळे भुरटे चोर बेलगाम
सध्या मुंबईतून लाखो परप्रांतीय आपल्या मूळगावी गेले आहेत. त्यामुळे झोपडपट्टी परिसरात अनेक घरांना टाळे लागलेले आहे. त्यामुळे दिवसा रेकी करून हे पाचही आरोपी रात्री घरफोड्या करीत होते, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. दरम्यान, कोरोनामुळे कारागृहात बंदिस्त कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी सरकारने कैद्यांना पेरॉलवर सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, भुरटे चोर याचा गैरफायदा घेत असल्याचेही या प्रकरणावरून समोर येत आहे.
-----------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )