
मोबाईलमध्ये महिलेचे विवस्त्र चित्रीकरण करून १९ लाख रुपये उकळणाऱ्या तरुणास कठोर शिक्षा करावी, अशी मागणी खारघरमधील पीडित महिलेने पोलिस आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केली आहे.
खारघर - घरकामासाठी बाई पाहिजे असे सांगून महिलेचे पाच वर्षे लैंगिक शोषण केले. तसेच मोबाईलमध्ये महिलेचे विवस्त्र चित्रीकरण करून १९ लाख रुपये उकळणाऱ्या तरुणास कठोर शिक्षा करावी, अशी मागणी खारघरमधील पीडित महिलेने पोलिस आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केली आहे.
खारघर सेक्टर ११ मधील एका गृहनिर्माण सोसायटीत काम करून परत जात असताना पाच वर्षांपूर्वी ३४ वर्षीय मोलकरीण महिलेस २५ वर्षीय तरुणाने सोसायटीच्या प्रवेशद्वारात गाठून घरकामासाठी मोलकरीण पाहिजे असे सांगितले. तसेच तिचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळवून मोलकरणीविषयी विचारणा केली. त्यानंतर आरोपीने महिलेच्या घरी कोणीही नसल्याची संधी साधून घरात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याशिवाय तिचे विवस्त्र अवस्थेत चित्रीकरण केले. इतक्यावरच न थांबता त्याने याविषयी कुठेही सांगितल्यास मुले आणि पतीला ठार मारण्याची धमकी दिली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
त्यानंतरदेखील आरोपीने वेळोवेळी महिलेशी संपर्क साधून चित्रफीत प्रसारित करण्याची भीती दाखवून घरी आणि लॉजवर बोलावून अनेक वेळा लैंगिक अत्याचार करून पैशांची मागणी केली. भीतीपोटी महिलेने बॅंकेत जमा असलेली पुंजी तसेच कर्ज घेऊन, स्वतःच्या अंगावरील दागिने गहाण ठेवून जवळपास १९ लाख रुपये आरोपीस दिले. नियमित होणारी पैशांची मागणी आणि लैंगिक शोषणामुळे त्रस्त झालेल्या महिलेने मार्चमध्ये घडलेला सर्व प्रकार पतीला सांगितला. अखेर पतीच्या मदतीने तिने खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
खारघर पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली होती; मात्र तो जामिनावर सुटला आहे. याबाबत पीडित महिलेने खारघर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे; मात्र पोलिसांनी जबाब घेताना आरोपीने कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन केलेली लूटमारी, तसेच विवस्त्र अवस्थेतील फोटो वेबसाईटवर प्रसिद्ध करणे, खंडणी, धमकावणे आदींबाबत अनेक कलमे लावून त्याच्यावर गुन्हा दाखल करणे आवश्यक होते; त्याकडे दुर्लक्ष केल्याचे महिलेचे म्हणणे आहे. त्यामुळे आरोपीवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडितेने केली आहे.
आत्महत्या करण्यापुर्वी अनेकदा तिने भावाला केला होता फोन..
चित्रफीत व्हायरल केल्याचा आरोप
आरोपी तरुण रोडपाली येथे वास्तव्यास असून आरोपीचा भाऊ हा भाजपचा कार्यकर्ता असल्यामुळे त्याच्यावर पोलिसांनी इतर गुन्हे दाखल केले नाहीत, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. आरोपीने पीडित महिलेकडून उकळलेल्या पैशांतून दुचाकी, चारचाकी वाहन, तसेच महागड्या किमतीचे मोबाईल, लॅपटॉप खरेदी केले. एवढेच नव्हे, तर सदर महिलेची चित्रफीत त्याने सोशल वेबसाईटवर प्रसिद्ध केल्याचे आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
पीडित महिलेने दिलेल्या जबाबानुसार सदर आरोपीवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. तसेच तिने दिलेल्या पत्राची योग्य ती दखल घेऊन पुढील तपास
केला जाईल.
- प्रदीप तिदार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खारघर