esakal | आत्महत्या करण्यापुर्वी अनेकदा तिने भावाला केला होता फोन..
sakal

बोलून बातमी शोधा

आत्महत्या करण्यापुर्वी अनेकदा तिने भावाला केला होता फोन..

मागील पाच-सहा महिने तिचा छळ सुरूच राहिल्याने शर्मिलाने आपल्या जीवाचे काहीतरी बरेवाईट करून घेणार असल्याचे आपल्या भावाकडे बोलून दाखविले होते.

आत्महत्या करण्यापुर्वी अनेकदा तिने भावाला केला होता फोन..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


पनवेल : सात महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या एका 19 वर्षीय तरुणीने पती व सासरच्या जाचाला कंटाळून मुंग्या मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना तळोजामध्ये उघडकीस आली आहे. या घटनेनंतर तळोजा पोलिसांनी या घटनेतील मृत विवाहितेच्या पतीसह सासू-सासरे, दीर आणि नणंद या पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकणी गुन्हा दाखल केला आहे. 
या घटनेतील मृत तरुणीचे नाव शर्मिला असे असून ती अंबरनाथ येथे राहाण्यास होती. मे 2019 मध्ये तिचा विवाह तळोजा नितळस येथील सतीश पावशे याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर जेवणासाठी बसलेल्या सतीश पावशे याने आपल्याला मांसाहारी जेवण का दिले नाही? असे बोलून लग्न मंडपात गोंधळ घातला होता. त्यानंतर नातेवाईकांनी त्याची समजूत काढली होती. त्यानंतर साधारण दोन महिने शर्मिलाचा संसार व्यवस्थित चालला.

ही बातमी वाचा ः कर्करोगाच्या तीन हजार रुग्णांसाठी भारतात एकच डाॅक्टर

मात्र नंतर शर्मिलाला तिच्या सासरकडील मंडळींनी वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्यास सुरुवात केली. मागील पाच-सहा महिने तिचा छळ सुरूच राहिल्याने शर्मिलाने आपल्या जीवाचे काहीतरी बरेवाईट करून घेणार असल्याचे आपल्या भावाकडे बोलून दाखविले होते. अखेर सासरकडील मंडळींचा छळ असह्य झाल्याने शर्मिलाने 26 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मुंग्या मारण्याचे औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 
यात शर्मिला अत्यवस्थ झाल्याने तिला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ही बातमी वाचा ः  सांभाळ केलेल्या मुलीला दत्तक घेण्याची परवानगी

एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असताना 29 डिसेंबर रोजी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. दरम्यान, शर्मिलाच्या मृत्यूनंतर तिच्या भावाने शर्मिलाच्या सासरकडील मंडळींविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर तळोजा पोलिसांनी शर्मिलाचा पती सतीश पावशे, सासू जयवंता पावशे, सासरे शमन पावशे, दीर जगदीश पावशे आणि नणंद दीपलता पाटील या पाच जणांविरोधात छळवणुकीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती तळोजा पोलिसांनी दिली. 

loading image