राज्यात पूरस्थिती; भाईंदरमध्ये नाच-गाणे 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 August 2019

मिरा रोड : पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकणात पुरामुळे लाखोचे संसार उद्‌ध्वस्त झाल्याने राज्यभर मदतीचा ओघ सुरू असतानाच मिरा-भाईंदर भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चातर्फे कजरी महोत्सवानिमित्त नाच-गाण्यांचा कार्यक्रम झाला. 

मिरा रोड : पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकणात पुरामुळे लाखोचे संसार उद्‌ध्वस्त झाल्याने राज्यभर मदतीचा ओघ सुरू असतानाच मिरा-भाईंदर भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चातर्फे कजरी महोत्सवानिमित्त नाच-गाण्यांचा कार्यक्रम झाला. शहरात सध्या अनेक राजकीय; तसेच सामाजिक संस्था पूरग्रस्तांच्या मदतकार्यात राबत असतानाच भाजपच्या या कार्यक्रमामुळे संताप व्यक्त केला जात आहे. 

भाईंदर येथील इंद्रलोक प्रमोद महाजन सभागृहात रविवारी (ता.11) रात्री अभियान संस्था आणि भाजपच्या उत्तर भातीय मोर्चातर्फे "कजरी महोत्सव' आणि "स्त्री-शक्ती सम्मान' कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या जाहिरात फलकावर नेत्यांच्या छायाचित्रांसोबत हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरपत्नी कनिका यांचेदेखील छायाचित्र वापरण्यात आले होते.

कार्यक्रम ठिकाणी भाजपच्या सदस्य नोंदणीचे अर्जही भरून घेतले जात होते. कार्यक्रमास महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह उत्तरप्रदेश सरकारच्या चित्रपट महामंडळाचे राज्यमंत्रीचा दर्जा असलेले अध्यक्ष तथा हास्यकलाकार राजू श्रीवास्तव, फिल्मसिटीचे अध्यक्ष अमरजित मिश्रा, उत्तर प्रदेशचे खासदार रमापती त्रिपाठी, उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष देवीप्रसाद उपाध्याय, लल्लन तिवारी आदी उपस्थित होते.

या वेळी भोजपुरी नाच-गाणी सादर करण्यात आली. हास्यकलाकार राजू श्रीवास्तव यांनी मिमिक्री सादर करून उपस्थितांचे मनोरंजनही केले; परंतु राज्यातील पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण आदी भागात पुराने हाहाकार माजवला असताना भाजपने घेतलेल्या या कार्यक्रमामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, या संदर्भात भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेणे टाळले. 

भाजपच्या स्थानिक नेत्यांनी राजकीय फायद्यासाठी कजरी महोत्सवात नाच-गाणे, मिमिक्री आणि पक्षाची सदस्यनोंदणी यासारखे उपक्रम राबवताना निदान राज्यातील पूरस्थितीचा विचार केला पाहिजे होता. तसेच हुतात्मापत्नी कनिका राणे यांचे छायाचित्र कुठे वापरावे, याचे भान ठेवले पाहिजे होते, असे मत अनेकांनी व्यक्त केले. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपने केला. 
- प्रदीप सामंत, कार्याध्यक्ष, मराठी एकीकरण समिती 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood in the state; Dance and song in Bhayandar near Mumbai