बदलापुरात पुराच्या झळा कायम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

२६ जुलैच्या रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आलेल्या महापुरात बदलापुरातील आठ ते दहा हजार घरे पाण्याखाली गेली होती. त्यात कोट्यवधींचे नुकसान झाल्याने सरकारी मदत पोहोचण्यासाठी पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.

बदलापूर : २६ जुलैच्या रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आलेल्या महापुरात बदलापुरातील आठ ते दहा हजार घरे पाण्याखाली गेली होती. त्यात कोट्यवधींचे नुकसान झाल्याने सरकारी मदत पोहोचण्यासाठी पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत सुमारे दीड हजार घरांचे आणि पन्नास हेक्‍टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तहसीलदार जयराज देशमुख यांनी व्यक्त केला आहे. 
 
अंबरनाथ तालुक्‍यात ५० हेक्‍टर शेतीचे नुकसान झाले आहे. सध्या तहसील विभागामार्फत पूरग्रस्त घरांचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. नियमाप्रमाणे नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. दरम्यान, बदलापूर पश्‍चिमेतील रमेशवाडी, हेंद्रेपाडा, गणेशनगर, दुबे बाग, भारत कॉलेज परिसर, दीपाली पार्क, शनीनगर, सर्वोदयनगर आदी भागांतील सुमारे आठ ते दहा हजार घरांमध्ये पाणी शिरले होते. तर शहरातील सुमारे अडीच हजार दुकानांना या पुराचा मोठा फटका बसला आहे.

पुराचे पाणी ओसरल्यानंतर नागरिकांनी घरात प्रवेश केला. मात्र पुराच्या पाण्यामुळे घरातील सर्व वस्तू पाण्याखाली आल्याने त्या वापरण्याजोग्या राहिल्या नाहीत. घरातील महत्त्वाची कागदपत्रे भिजली असून, भिजलेले धान्य, गाद्या, कपडे नागरिकांनी बाहेर टाकले आहेत. नगरपालिका प्रशासनाकडून हा कचराही वेळीच उचलला जात आहे. 

पूरग्रस्तांना जादा मदत द्यावी : कपिल पाटील 
भिवंडी लोकसभा क्षेत्रात २६ जुलैच्या मध्यरात्री आलेल्या महापुराचा मुद्दा खासदार कपिल पाटील यांनी आज लोकसभेत मांडला. बदलापूर, वांगणी, कल्याण परिसरातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला जास्तीत जास्त मदत द्यावी, अशी मागणी खासदार पाटील यांनी केली. या महापुरात नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. चाळीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घराच्या पत्र्यापर्यंत पाणी पोहोचले; तर अनेक इमारतींनाही या महापुराची झळ सहन करावी लागली. सरकारने मदत दिल्यास हजारो पूरग्रस्तांना फार मोठा दिलासा मिळेल, अशी आशा खासदार पाटील यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Floods in Badalpur continue