जयंती, उत्सव, लग्नसमारंभ रद्द झाल्याने लोककलावंतांची उपासमार; सरकारला मदतीची हाक

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 22 April 2020

  • दहा हजार लोककलावंतांची उपासमार
  • अर्थसाहाय्याची सरकारकडे मागणी

मुंबई : राज्यात जत्रा, महापुरुषांचे जयंती उत्सव, लग्न समारंभ कोरोनामुळे रद्द झाले आहेत. परिणामी 10 हजारांहून अधिक लोककलावंतांची उपासमार सुरू आहे. या लोककलावंताना आर्थिक मदत करा, अशी मागणी काँग्रेसच्या लोककलावंत कक्षाने राज्य सरकारकडे केली आहे. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबईसह राज्यातील 10 हजारांहून अधिक कलावंतांची नोंद काँग्रेसच्या लोककला सेलकडे असल्याची माहिती अध्यक्ष विष्णू शिंदे यांनी  दिली. या लोककलावंतांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी त्यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

कोरोनाच्या फैलावाला अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी लागू केली. राज्यात सर्वत्र होणाऱ्या यात्रा, उत्सव, लग्न समारंभ व महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम थांबले आहेत. यात्रांमध्ये लोकनाट्य, तमाशाचे कार्यक्रम करणारे फडमालक, लग्न सोहळ्यात वादन करणारी बँड पथके, सनईवादक, जागरण गोंधळ घालणारे कलावंत आणि जयंती उत्सवात करमणूक, प्रबोधनाचे कार्यक्रम करणारे शाहीर, कव्वाल, जलसाकार, लोकगायक, वाद्यवृंद कलावंत सध्याच्या परिस्थितीमुळे हवालदिल झाले आहेत. 

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा

महाराष्ट्रातील 10  हजारांहून अधिक लोककलावंत अशा विवंचनेत दिवस काढत आहेत. अशा अडचणीच्या काळात लोककला आणि कलावंत जगावेत म्हणून त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

हंगाम बुडाला
या सर्व कलावंतांचे कार्यक्रम कोरोनाच्या महामारीमुळे रद्द झाले आहेत.मार्च-एप्रिल-मे या तीन महिन्यांत होणाऱ्या कार्यक्रमांवर पुढील वर्षभर परिवाराची गुजराण करणाऱ्या कलावंतांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. कार्यक्रमांचा हंगाम बुडाला. संसर्गाच्या भीतीमुळे घराबाहेर पडता येत नाही, अशी व्यथा कलावंतांनी मांडली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Folk artists starve due to cancellation of anniversaries, celebrations and weddings