या जिल्ह्यात "लेफ्ट-राईट'मुळे धडकी 

प्रमाेद जाधव
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

एसटी स्थानक, बाजारपेठ, आठवडा बाजार, शाळा, महाविद्यालये आदी परिसरात महिलांच्या छेडछाडीचे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात. रोडरोमिओंमुळे महिलांसह, नागरिकांनाही त्रास होतो. जिल्ह्यात रस्त्यात महिलांचे सोन्याचे दागिने, पर्स खेचण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी बीट मार्शल, दामिनी पथक आदींद्वारे प्रयत्न सुरू आहेत.

अलिबाग : गर्दीत महिलांची छेडछाड करणे, सोन्याचे दागिने खेचणे असे प्रकार जिल्ह्यात सातत्याने वाढत आहेत. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी रायगड जिल्हा पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यानुसार वाहनांऐवजी पोलिस आता लेफ्ट-राईट करत पायी गस्तीवर भर देणार आहेत. जिल्हा मुख्यालयाने यासंदर्भातील सूचना सर्व ठाण्यातील अधिकाऱ्यांना केल्या असून गुन्हेगारांना त्यामुळे नक्कीच धडकी भरेल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे.

हे वाचा : विंटेज कार रॅलीवर नजरा  

जिल्ह्यातील एसटी स्थानक, बाजारपेठ, आठवडा बाजार, शाळा, महाविद्यालये आदी परिसरात महिलांच्या छेडछाडीचे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात. रोडरोमिओंमुळे महिलांसह, नागरिकांनाही त्रास होतो. जिल्ह्यात रस्त्यात महिलांचे सोन्याचे दागिने, पर्स खेचण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी बीट मार्शल, दामिनी पथक आदींद्वारे प्रयत्न सुरू आहेत. 

त्यानंतर आता कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पायी गस्त (फुट पेट्रोलिंग) सुरू करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिले आहेत. 
पोलिसांच्या गणवेशात, छोट्या पथकाद्वारे पायी गस्त ही नागरिकांमध्ये विश्वास वाढविण्याचा प्रयत्न आहे; तर गुन्हेगारांना त्यामुळे जरब बसेल, असा विश्‍वास जाणकार व्यक्त करत आहेत. 

"फूट पेट्रोलिंग' ही पूर्वीपासून सुरू आहे. आता ती अधिक प्रभावी करण्यात येणार आहे. गर्दीमध्ये होणारे अनुचित प्रकार व चोऱ्यांवर त्याद्वारे अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. 
- सचिन गुंजाळ, अपर पोलिस अधीक्षक, रायगड 

बाजारात किंवा अन्य गर्दीच्या ठिकाणी भुरटे चोर सोन्याचे दागिने खेचतात. पर्समधील पैसे चोरणारेही रायगड जिल्ह्यात सक्रिय आहेत. त्यामुळे खूपच दक्ष राहावे लागते. या प्रकारामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. रायगड पोलिस दलाच्या वतीने पायी गस्त घालण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे भुरट्या चोरांवर अंकुश राहील, असा विश्वास आहे. 
- कल्पना चव्हाण, गृहिणी 

सार्वजनिक ठिकाणी पाकीटमारीच्या घटना वारंवार होतात. महिलांच्या गळ्यातील दागिनेही लंपास होतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. सार्वजनिक ठिकाणी पायी गस्त घालण्याचा रायगड पोलिसांचा कौतुकास्पद आहे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी आवश्‍यक आहे. त्याद्वारे भुरटे चोर आणि रोडरोमिओंना जरब बसेल. 
- दीपक पाटील, सामाजिक कार्यकर्ता 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Foot Patrolling now it is going to be more effective.