कुलाबा किल्ल्याची तटबंदी मजबूत होणार; दुरुस्तीसाठी ४६ लाखांचा आराखडा तयार

महेंद्र दुसार
Saturday, 3 October 2020

अलिबाग : पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या कुलाबा किल्ल्याला झळाळी देण्यासाठी तातडीची डागडुजी आवश्यक आहे. ढासळलेल्या तटबंदीच्या दुरुस्तीसाठी ४६ लाखांचा आराखडा तयार केला आहे. त्याचबरोबर कुलाबा किल्ल्यात साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांचे योग्य पद्धतीने आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री अदिती तटकरे यांनी शुक्रवारी कुलाबा किल्ल्याची पाहणी केल्यानंतर दिली.

अलिबाग : पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या कुलाबा किल्ल्याला झळाळी देण्यासाठी तातडीची डागडुजी आवश्यक आहे. ढासळलेल्या तटबंदीच्या दुरुस्तीसाठी ४६ लाखांचा आराखडा तयार केला आहे. त्याचबरोबर कुलाबा किल्ल्यात साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांचे योग्य पद्धतीने आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री अदिती तटकरे यांनी शुक्रवारी कुलाबा किल्ल्याची पाहणी केल्यानंतर दिली.

सुशांतची हत्या की आत्महत्या, सीबीआयने लवकरात लवकर निकाल द्यावा

कुलाबा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल इतिहासाची माहिती येणाऱ्या पर्यटकांना मिळावी यासाठी शासकीय मार्गदर्शक (गाईड) नेमण्यात येणार आहेत. कुलाबा किल्ल्याच्या डागडुजीचे काम नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली.

केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या (एएसआय) अधिकाऱ्यांसोबत १९ सप्टेंबरला ऑनलाईन बैठक घेतल्यानंतर शुक्रवारी (ता. २) सायंकाळी पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पुरातत्त्व विभाग मुंबई सर्कलचे अधीक्षक (प्रभारी) डॉ. राजेंद्र यादव यांनी कुलाबा किल्ल्याला भेट दिली. या वेळी त्यांनी संपूर्ण किल्ल्याची पाहणी करून झालेल्या पडझडीची प्रत्यक्ष पाहणी केली.

कुलाबा किल्ला जतन व संवर्धन मोहिमेअंतर्गत अलिबाग येथील कार्यकर्ते किशोर अनुभवणे, यतीराज पाटील, आकाश राणे, वैभव भालकर यांनी किल्ल्याची दुरवस्था झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. याची खासदार सुनील तटकरे यांनी तत्काळ दखल घेत तातडीच्या दुरुस्तीसाठी ४६ लाखांचा आराखडा मंजुरीसाठी पाठवत आज कुलाबा किल्ल्याला भेट दिली. मंत्री आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे कुलाबा किल्ल्याला दिलेली ही पहिलीच भेट ठरली आहे.

करण्यात येणारी कामे
दीपमाळ, पूर्व आणि पश्चिमेकडील बुरुजांची दुरुस्ती, तलावाची स्वच्छता, पडझड झालेल्या भागाची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि सुशोभीकरण.

कुलाबा किल्ला हे रायगड जिल्ह्याचे वैभव आहे. त्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी काही तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. तयार करण्यात आलेल्या आराखड्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी निधीची गरज लागणार आहे. त्यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.
- अदिती तटकरे,
पालकमंत्री, रायगड

(संपादन - बापू सावंत)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The fortifications of Colaba fort will be strengthened