esakal | त्यांनी लावला भारत-न्यूझीलंड सामन्यावर सट्टा; पोलिस थेट दारात
sakal

बोलून बातमी शोधा

भारत-न्यूझीलंड सामन्यावर सट्टा लावणाऱ्या चौघांना अटक

नवी मुंबई पोलिसांनी बुधवारी सायंकाळी घणसोली, सेक्‍टर- 8 मधील एका फ्लॅटवर छापा मारला. या छाप्यात भारत-न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यावर प्ले या ऍपचा वापर करून, ऑनलाईन बेटिंग लावणाऱ्या चार सट्टेबाजांना अटक केली. 

त्यांनी लावला भारत-न्यूझीलंड सामन्यावर सट्टा; पोलिस थेट दारात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी बुधवारी सायंकाळी घणसोली, सेक्‍टर- 8 मधील एका फ्लॅटवर छापा मारला. या छाप्यात भारत-न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यावर प्ले या ऍपचा वापर करून, ऑनलाईन बेटिंग लावणाऱ्या चार सट्टेबाजांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी 12 मोबाईल, 2 लॅपटॉप, 1 टीव्ही आणि रोख रक्कम असा सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त केला.
 
घणसोली, सेक्‍टर- 8 मधील कलिस्टा हाऊसिंग सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये काही व्यक्ती लॅपटॉप व मोबाईल फोनचा वापर करून भारत- न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यावर ऑनलाईन बेटिंग लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने बुधवारी दुपारी घणसोलीतील कलिस्टा हाऊसिंग सोसायटीतील बी विंगमध्ये 1602 क्रमांकाच्या फ्लॅटवर छापा मारला. या वेळी या फ्लॅटमध्ये अमन संजय शर्मा (23), खौझेमा अब्दुलहुसेन हुसेनी (33), अनुराग विनोदकुमार खरे (29) हे तिघेही लॅपटॉपमधील प्ले या ऍपच्या सहाय्याने व मोबाईल फोन तसेच इतर साहित्याचा वापर करून ऑनलाईन बेटिंग लावताना आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी तिघा सट्टेबाजांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, सामन्यावरील हा जुगार मेहुल जैन चालवित असल्याची माहिती मिळाली. यादरम्यान, अनुराग याच्या मोबाईलवर मेहुल जैन याचा फोन आल्याने पोलिसांनी त्याच्या माध्यमातून मेहुल जैन याला त्या ठिकाणी बोलावून घेतले. त्यानुसार तो त्या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे क्रिकेट बेटिंगसंदर्भात चौकशी केली. या चौकशीत त्याने हा क्रिकेट बेटिंग हा जुगार तो स्वत: चालवित असल्याचे कबुल केले. 

जुगारप्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल 
पोलिसांनी या चौघांवर महाराष्ट्र जुगारप्रतिबंधक कायद्यानुसार रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली. या वेळी बेटिंग लावण्यासाठी वापरण्यात आलेले 12 मोबाईल फोन, 2 लॅपटॉप, 1 टीव्ही आणि रोख रक्कम या वेळी जप्त करण्यात आली.