वृद्धाच्या पायाला चार किलोची गाठ! शस्त्रक्रियेमुळे आठ वर्षांच्या दुखण्यातून सुटका

भाग्यश्री भुवड
Sunday, 22 November 2020

चिपळूणमध्ये राहणाऱ्या एका 64 वर्षीय वयोवृद्धाच्या पायातून तब्बल 18 सेंटिमीटरची गाठ (ट्यूमर) काढण्यात चेंबूरच्या झेन रुग्णालयातील डॉक्‍टरांना यश आले.

मुंबई : चिपळूणमध्ये राहणाऱ्या एका 64 वर्षीय वयोवृद्धाच्या पायातून तब्बल 18 सेंटिमीटरची गाठ (ट्यूमर) काढण्यात चेंबूरच्या झेन रुग्णालयातील डॉक्‍टरांना यश आले. आश्‍चर्याची बाब म्हणजे ही गाठ चार किलोची होती. कोव्हिडकाळात या रुग्णाच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांची या वेदनेतून आठ वर्षांनंतर कायमची सुटका झाली. 

हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करणार! कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर बोलण्याची शक्यता

महेंद्र मेघानी (नाव बदललेले) हे चिपळूणमध्ये राहणारे आहेत. लठ्ठपणा आणि मधुमेहाने ते त्रस्त होते. 2012 पासून त्यांच्या डाव्या पायाला सूज येत होती. स्थानिक डॉक्‍टरांकडून उपचार घेतले; परंतु फारसा फरक पडला नाही. सूज वाढू लागल्याने त्यांना दैनंदिन कामही करता येत नव्हते. त्यात कोव्हिडमुळे देशभरात लॉकडाऊनची स्थिती होती. अशा स्थितीत पायाची वेदना वाढू लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना मुंबईतील झेन रुग्णालयात दाखल केले. 

हेही वाचा - शिवप्रेमींमध्ये आनंद! आठ महिन्यांनंतर 'रायगड'चा रोपवे पर्यटकांसाठी खुला

रक्तवाहिन्या आणि स्नायूंना कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून डाव्या मांडीवर एक चीर करून हा ट्यूमर काढण्यात आला. ही शस्त्रक्रिया तीन तास सुरू होती. साधारण 350 मिलिमीटर रक्त वाया गेले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला काही दिवस डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली ठेवले होते. गुडघ्यातील स्नायूंना बळकटीपणा यावा, यासाठी नियमित व्यायाम करण्याचा सल्ला रुग्णाला देण्यात आला आहे. 

 

रुग्णाला जेव्हा उपचारासाठी आणले तेव्हा त्यांची प्रकृती ठीक नव्हती. डाव्या पायाला सूज व वेदना होत होती. त्यांना पायाची हालचालही करताना अडचणी येत होत्या. रुग्णाचे वजन 81 किलो होते. पायाला सूज नेमकी कशामुळे आहे, हे जाणून घेण्यासाठी अँटिपिकल लिपोमाचे प्रियोपोरेटिव बायोप्सी करण्यात आली. वैद्यकीय चाचणीत पायाला गाठ असल्याचे निदान झाले. ही गाठ डाव्या मांडीपर्यंत पसरली होती. साधारण 18 सेंटिमीटरची गाठ डाव्या मांडीच्या स्नायूंना चिकटली होती. अशा स्थितीत एमआरआय चाचणी केली. यात रक्तवाहिन्या व डाव्या मांडीच्या नसा जवळजवळ होत्या. अशा परिस्थितीत डॉक्‍टरांनी 20 ऑक्‍टोबरला शस्त्रक्रिया करून पायातील गाठ काढली. 
- डॉ. तन्वीर अब्दुल मजीद, 
सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, झेन मल्टिस्पेशालिटी रुग्णालय 

A four kg lump on the old mans leg Surgery relieves eight year old pain

------------------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A four kg lump on the old mans leg Surgery relieves eight year old pain