31 मार्च पासून राज्यातील चार दूरदर्शन केंद्रे बंद होणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 मार्च 2020

दूरदर्शनच्या खोपोली येथील लघु केंद्रासह बदलापूर, संगमनेर आणि शिर्डी ही चार केंद्रे 31 मार्चपासून बंद होणार आहेत. यापूर्वी माहिती व प्रसारण खात्याकडून दूरदर्शनची 125 प्रक्षेपण केंद्रे बंद करण्यात आली आहेत.

खोपोली : दूरदर्शनच्या खोपोली येथील लघु केंद्रासह बदलापूर, संगमनेर आणि शिर्डी ही चार केंद्रे 31 मार्चपासून बंद होणार आहेत. यापूर्वी माहिती व प्रसारण खात्याकडून दूरदर्शनची 125 प्रक्षेपण केंद्रे बंद करण्यात आली आहेत. याच धर्तीवर ही चार केंद्रे 31 मार्च रोजी रात्री 12 वाजता बंद करण्यात येणार आहेत. 

देशात दूरदर्शनचे आगमन झाल्यानंतर त्यांचे कार्यक्रम पाहण्यासाठी दूरचित्रवाणीला मोठा प्रतिसाद मिळाला; मात्र मधल्या काळात खासगी वाहिन्या मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळे दूरदर्शनचा प्रेक्षकवर्ग कमी झाला. डिश अँटेना तसेच केबलद्वारे खासगी वाहिन्यांचे जाळे गावागावात पसरले, तसेच तंत्रज्ञानातदेखील मोठे बदल झाले. त्यामुळे दूरदर्शनच्या स्थानिक प्रक्षेपण केंद्राचे महत्त्व कमी झाल्याने तसेच दूरदर्शनची ही यंत्रणा कालबाह्य ठरू लागल्याने टप्प्या टप्प्याने ती बंद करण्यात येत आहे. 

केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण विभागाकडून विविध ठिकाणी असलेली दूरदर्शनची केंद्रे 2018 पासून बंद करण्याची अंमलबजावणी सुरू आहे. देशात अशी सुमारे 14 हजार प्रक्षेपण केंद्रे आहेत. पहिल्या चार टप्प्यांत यातील सहाशे केंद्रे बंद करण्यात आली आहेत; तर पाचव्या टप्प्यात आणखी 125 केंद्र बंद होणार असल्याचे संकेत दिले गेले आहेत. यामध्ये राज्यातील खोपोली येथील केंद्रासह अन्य चार केंद्रांचा समावेश आहे. खोपोलीतील हे केंद्र 1985 पासून कार्यान्वित होते. यापूर्वी राज्यातील अनेक केंद्रे बंद झाली. येथील कामगारांना नोकरीत कायम ठेवले असले, तरी या कामगारांना शासन देईल त्या ठिकाणी कामावर जावे लागणार आहे. 

ही बातमी वाचा ः भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार 
खोपोली काजूवाडी टेकडीवरील दूरदर्शनचे प्रसारण केंद्र 1985 मध्ये अस्तित्वात आले. या केंद्राच्या माध्यमातून खोपोली आणि परिसरातील खालापूर व कर्जत तालुक्‍यात दूरदर्शनचे प्रसारण होत होते; मात्र डिजिटल युगात या केंद्राचे महत्त्व व आवश्‍यकता कमी झाली. त्याचा परिणाम स्वरूप हे केंद्र 31 मार्चपासून बंद होणार आहे. या केंद्रात एकूण 12 कर्मचारी कार्यरत असून, सॅटेलाईट सिस्टीमसाठी तीन मोठ्या छत्र्या व दोन टॉवर आहेत. 

"प्रसारभारती बोर्ड'च्या आदेशानुसार दूरदर्शन अनुरक्षण केंद्र नाशिकच्या अंतर्गत खोपोली लघुशक्ती प्रेक्षपण केंद्र येते. या प्रक्षेपण केंद्रावरून सुरू असणारे राष्ट्रीय तथा प्रादेशिक प्रसारण 31 मार्चच्या मध्यरात्रीपासून बंद होणार आहे. याबाबतचे लेखी आदेश प्रसार भारतीकडून खोपोली कार्यालयास प्राप्त झाले आहेत. येथील कर्मचाऱ्यांना अन्य ठिकाणी सेवेत कायम ठेवले जाईल, असाही या आदेशात उल्लेख आहे. 
-मंजुषा वट्टमवार, सहायक अभियंता, लघु प्रक्षेपण केंद्र, खोपोली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four television stations in the state will be closed from March 31