Fractured Freedom Kobad Ghandy : स्वातंत्र्याच्या मूल्यांबाबत लिहिणे चुकीचे आहे का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fractured Freedom Kobad Ghandy

Kobad Ghandy Interview

कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकावरून महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यावरुन अनेक साहित्यिकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेत. डून स्कूल, झेवियर्स ते लंडनमध्ये शिकलेल्या आणि पारसी सुखवस्तू कुटुंबात जन्माला आलेल्या कोबाड गांधी यांच्या जीवनातील आठवणी, जेलमधील अनुभव यावर हे पुस्तक आधारित आहे. माओवादाचा शिक्का बसलेल्या कोबाड गांधी यांना भारतातील विविध तुरुंगात या आरोपाखाली १० वर्ष काढावी लागली. या पुस्तकावरुन उठलेला वाद आणि पुस्तकाबद्दल कोबाड गांधी यांची विनोद राऊत यांनी घेतलेली ही मुलाखत...

Fractured Freedom

Kobad Ghandy : स्वातंत्र्याच्या मूल्यांबाबत लिहिणे चुकीचे आहे का?

पुस्तकात चुकीचे काय?

‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ हे मूळ इंग्रजी पुस्तक मार्च २०२१ मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकाचा मराठी अनुवाद होऊन वर्षभरापेक्षा जास्त कालावधी झाला. त्यावर आतापर्यंत कुठलाही वाद झाला नाही. ज्या वेळी पुस्तकाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला, त्या वेळी आक्षेप घ्यायला हवे होते; मात्र हा पुरस्कार दिला आणि काढून घेतला, हा खूप अनैतिक आणि मनमानी पद्धतीचा निर्णय आहे. माझी पत्नी अनुराधा हिने सांगितलेल्या स्वातंत्र्य आणि आनंदाच्या मूल्याबद्दल या पुस्तकात मी लिहिले आहे. यात काय चूक आहे? माझा आणि साहित्य क्षेत्राचा तसा काही संबंध नाही. मी राजकीय, सामाजिक चळवळीचा माणूस आहे; मात्र अनेक साहित्यिक ज्यांना मी ओळखत नाही, तेसुद्धा या पुस्तकाच्या बाजूने उभे राहिले. अनेकांचे मला फोन आले. साहित्य समितीचे सदस्य, पत्रकार आणि लेखक सर्व जण माझ्या समर्थनार्थ उभे राहिले. अनेकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. माझ्या पुस्तकाच्या अनुवादाला पुरस्कार मिळाला आहे. मुळात तुम्हाला आक्षेप आहे, तर या अनुवादाला पुरस्कार दिलाच कशाला? मी अनुराधा मॉडेलचे मूल्य यामध्ये सांगितले आहे. लोकांना आनंद, स्वातंत्र्य नको का, हा खरा प्रश्न आहे.

मीडिया ट्रायल

मी माओवादी आहे, या आरोपावरून माझे मीडिया ट्रायल झाले. या मीडिया ट्रायलमुळे मला १० वर्षे कारागृहात राहावे लागले. आता मला न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. माझ्यावर चुकीचे आरोप लावले गेले होते. हे आता सिद्ध झाले आहे. सर्व प्रकरणात माझी सुटका झाली. हे मी पहिल्यापासून सांगत होतो; पण माझे माध्यमांनी ऐकलेच नाही.

पुस्तक का काढलं?

माझे पुस्तक जीवनातील अनुभवावर आधारित आहे. मला मुळात पुस्तक काढायचे नव्हते. मात्र, कारागृहाबाहेर आलो तेव्हा अनेकांनी मला सांगितले, की तुम्ही तुमच्या जीवनावर लिहिले पाहिजे. त्यामुळे मी पुस्तक लिहिले. यामध्ये कारागृहातील अनुभवांवर लिहिले आहे. मी काही नकारात्मक लिहिले नाही. या दरम्यान भेटलेले डॉन, गुन्हेगारांवर मी लिहिले आहे.

पुस्तकाला प्रतिसाद

या पुस्तकाला खूप प्रतिसाद मिळाला. दोन वर्षे ॲमेझॉनच्या बेस्ट सेलरच्या लिस्टमध्ये हे पुस्तक होते. पुस्तकाला चांगली मागणी होती. मला वाचकांकडून खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या. या पुस्तकाचा खप चांगला होता.

डाव्यांकडून सर्वाधिक टीका

माझ्या पुस्तकाला सर्वाधिक विरोध कम्युनिस्ट विचारधारेच्या लोकांनी केला. पण, मी काय करू? मला जे वाटले ते लिहिले. आता जगामध्ये डाव्या विचारधारेचे अस्तित्व कमी झाले. का झाले? कारण डाव्यांच्या अनेक चुका झाल्या असतील ना. त्या चुका सांगण्याचा प्रयत्न केला. मी त्यावर ठाम आहे. १९७० मध्ये अर्धे जग डावे होते- सोव्हिएत रशिया, चीन, अनेक युरोपियन, लॅटिन अमेरिकन देश. आता काहीच राहिले नाही. या पुस्तकात डावी चळवळ, विचारधारा संपण्यामागचे कारण मी शोधले. पुढेही मी शोधत राहणार. जातव्यवस्थेसंदर्भातील डाव्यांची विचारधारा चुकली. आर्थिक प्रगती झाली, तर जातव्यवस्था आपोआप जाईल, असा त्यांचा विचार होता. मात्र, ते चुकले. देशातील जातव्यवस्था आपोआप कधीच जाणार नाही. लहानपणीपासून डोक्यामध्ये भिनलेल्या गोष्टी डोक्यातून कधीच जाणार नाहीत. केवळ जातव्यवस्था नव्हे, तर अनेक बाबतीत डावे चुकले. त्यांनी स्वातंत्र्य आणि आनंद यावर आधारित त्यांचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे.

दलित चळवळ

लंडनमध्ये शिक्षण घेत असताना, तिथल्या रंगभेदामुळे, वसाहतवादी मानसिकता, मार्क्सवादी साहित्य वाचल्यामुळे आणि त्यावेळच्या प्राप्त परिस्थितीमुळे मी डाव्या चळवळीकडे वळलो. १९६८ ला डावी चळवळ प्रभावशाली होती. मात्र, पुढे भारतात आल्यानंतर मला जातव्यवस्था पाहायला मिळाली, त्यामुळे मला धक्का बसला. देशातील जातव्यवस्था खूप वाईट आहे. मला सुरुवातीला माहिती नव्हते. दलित पँथरच्या चळवळी सुरू झाल्या, बीडीडी चाळीत दंगल उसळली होती. त्या वेळी मला जातव्यवस्थेचे स्वरूप कळले. त्या वेळी दलित पँथर, रिडल्स, नामांतर आंदोलन उभे राहिले. त्यानंतर मी दलित चळवळीत सक्रियपणे काम केले. १९८० नंतर मी नागपुरातील इंदोरामध्ये चळवळीनिमित्ताने राहिलो.

चळवळींचे भविष्य

आमच्या काळात डावी, दलित चळवळ सशक्त होती. आता कुठली चळवळ राहिली नाही. १९९० मध्ये परिस्थिती बदलली. मोबाईल, इंटरनेट आले आणि तरुण लोक त्याच्या मागे लागले. आता तरुण पिढीचे काही आदर्श उरले नाहीत. आमचे तर वय झाले. नव्या पिढीचे कसे होईल माहिती नाही.

कारागृहातील अनुभवाबद्दल...

मी कारागृहात १० वर्षे काढली. त्यातील ६ वर्षे मी तिहारमध्ये होतो. तिहार सोडले तर राज्यातील इतर कारागृहांतील वातावरण, व्यवस्था तशा चांगल्या आहेत. हैदराबाद, विशाखापट्टण, रांची येथील कारागृहात मला फारशा अडचणी आल्या नाहीत. ते सर्व अनुभव मी पुस्तकात सविस्तर लिहिले. मात्र, ते खूप वाईट आहे अशा स्वरूपाचे लिखाण मी केले नाही. १० वर्षे तुरुंगात काढल्यामुळे माझ्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला. मी आता चालू शकत नाही. अनेक आजाराने त्रस्त आहे. माझी आरोग्याची परिस्थिती वाईट आहे. आजच मी रुग्णालयातून आलो.

अफजल गुरू

अफजल गुरूमध्ये माणुसकी होती, तो नीडर होता, असे मी लिहिले आहे; मात्र अफजल गुरूच्या व्यक्तिगत आस्थेबद्दल त्यात लिहिलेले नाही. तुरुंगात मी जो अफजल गुरू पाहिला, अनुभवला तेवढेच मी लिहिले. अफजल गुरूचे विचार, त्याची आस्था मला माहिती आहे. त्यावर कधी मी चर्चाही केली नाही. त्याच्या माणुसकीवर मी लिहिले. तो माणूस म्हणून चांगला होता. त्याची विचारधारा आणि माझी विचारधारा वेगवेगळी आहे.

अनेकांशी संपर्क तुटला

माझ्या आयुष्यात साथ देणारे अनेक मित्र आज हयात नाहीत. आई-वडिलांचे छत्र हरवले. काही मोजकेच मित्र माझ्या संपर्कात आहेत. डाव्या चळवळीचे लोक माझ्या संपर्कात नाहीत. त्यांच्याकडे नवे विचार नाहीत. चांगल्या कल्पना नाहीत. नवे विचार असायला पाहिजेत. त्यामुळे मी डाव्यांच्या संपर्कात राहत नाही. ते माझ्याशी संबंध ठेवत नाही.

लिखाण

माझे लिखाण अजूनही सुरू आहे. मी ७५ वर्षांच्या स्वातंत्र्यावर विस्तृत लेख लिहिला. अनुराधा यांच्या आनंद, स्वातंत्र्याच्या मॉडेलवर माझ्या पुस्तकात मी लिहिले. त्यामुळे अनेकांनी अनुराधा यांचे आत्मचरित्र आहे का, अशी विचारणा केली. त्यामुळे मी आता अनुराधा यांचे चरित्र लिहितो आहे.

कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यावरून अनेक साहित्यिकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेत. डून स्कूल, झेवियर्स ते लंडनमध्ये शिकलेल्या आणि पारसी सुखवस्तू कुटुंबात जन्माला आलेल्या कोबाड गांधी यांच्या जीवनातील आठवणी, जेलमधील अनुभव यावर हे पुस्तक आधारित आहे. माओवादाचा शिक्का बसलेल्या कोबाड गांधी यांना भारतातील विविध तुरुंगात या आरोपाखाली १० वर्षे काढावी लागली. या पुस्तकावरून उठलेला वाद आणि पुस्तकाबद्दल कोबाड गांधी यांची विनोद राऊत यांनी घेतलेली ही मुलाखत...