
Mumbai Police Recruitment Fraud: मुंबई पोलीस भरतीत पुन्हा गैरप्रकार! १६ उमेदवारांवर गुन्हा दाखल
Mumbai Police Recrutment Fraud: मुंबई पोलीस भरतीत पुन्हा एकदा गैरव्यवहार समोर आला आहे. या प्रकरणात १६ उमेदवारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरतीदरम्यान, चीपची आदलाबदल केल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसून आल्यानंतर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. पहिल्यांदाच पोलीस भरतीमध्ये चीपचा वापर करण्यात आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मैदानी चाचणीदरम्यान धावण्याच्या शर्यतीत जास्त गुण मिळवण्याच्या उद्देशानं काही उमेदवारांनी चीपची आदलाबदल केली. मात्र, चीपमध्ये नोंदवला गेलेला वेळ आणि सीसीटीव्हीची पडताळणी केल्यानंतर हा गैरप्रकार समोर आला आहे.
मुंबई पोलिसांच्या भरतीला मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात झाली असून मरोल, नायगाव आणि मुंबई विद्यापीठाच्या मैदानावर ही भरती प्रक्रिया सुरु आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी १६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यांपैकी पहिला गुन्हा ३ मार्च रोजी दाखल झाला तर शेवटचा गुन्हा २३ मार्च रोजी दाखल झाला.
हे ही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
भरतीत चिपचा प्रयोग काय आहे?
भरतीतील नव्या चीप तंत्राचा वापर म्हणजे धावण्याच्या चाचणीदरम्यान उमेदवाराची नोंदणी होते त्यानंतर त्याला एक क्रमांक दिला जातो, या क्रमांकानुसार नंतर त्याला दोन चीप दिल्या जातात. या दोन्ही चीप दोन पायांमध्ये बांधायची असते. धावण्याची शर्यत संपल्यानंतर या चीपमध्ये धावण्याची वेळ नोंदवली जाते. ज्या उमेदवारांनी चीपची आदलाबदल केली त्यांच्या वेळेत एक मिनिटाचा फरक दिसून आला. त्यामुळं पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी सीसीटीव्ही तपासलं तर त्यात गैरप्रकार झाल्याचं समोर आलं.